मुक्तपीठ टीम
ट्रेनमध्ये प्रवास करताना अनेक वेळा लोक आपल्या जीवनावश्यक वस्तू किंवा बॅग विसरतात आणि त्यानंतर सुरू होते ती बॅग मिळवण्यासाठीची शर्यत. असाच एक प्रकार मुंबईतील अंधेरीमध्येही समोर आला आहे. एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एका कुटुंबाची १७ लाख रुपयांच्या दागिन्यांनी भरलेली बॅग हरवली होती. या घटनेने कुटुंब अगदी तणावाखाली आले. मात्र, तक्रारीनंतर जीआरपीच्या जवानाने बॅग शोधून ती परत केली.
दागिन्यांच्या हरवलेल्या बॅगेचे सविस्तर प्रकरण
- मुंबईतील अंधेरी भागात राहणारे अन्नमपल्ली कुटुंब तेलंगणातील त्यांच्या गावी गेले होते. जिथे ते एका वार्षिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.
- कार्यक्रमाला उपस्थित राहून हे कुटुंब चेन्नई एक्स्प्रेसने मुंबईला परतत होते.
- सकाळी हे कुटुंब दादर स्टेशनवर उतरले. त्यानंतर ते लोकल ट्रेनने अंधेरी येथील त्यांच्या घरी आले.
- घरी पोहोचल्यानंतर आनंद अन्नमपल्लीच्या लक्षात आले की, दागिने असलेली बॅग ट्रेनमध्येच राहिली आहे.
- त्यानंतर लगेचच आनंद अन्नमपल्ली यांनी कुटुंबीयांच्या मदतीने जीआरपीकडे तक्रार दाखल केली.
- तक्रारीनंतर लगेचच जीआरपी पथक कारवाईत दाखल झाले. त्यांनी सीएसएमटी स्टेशनवर ट्रेनचा शोध घेण्याचे ठरवले पण तोपर्यंत ट्रेन यार्डातून निघून गेली होती.
जीआरपी जवान ईश्वर जाधवची कौतुकास्पद कामगिरी
जीआरपीचे हवालदार ईश्वर जाधव यांनी यार्डात जाऊन झडती घेण्याचे ठरवले. मात्र, तिथे पोहोचल्यावर ट्रेनने साफसफाई सुरू केल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी आपत्कालीन खिडकीतून आत प्रवेश केला. त्याने कोचच्या प्रत्येक कोपऱ्याची झडती घेतली, त्यावेळी त्याला सीटखाली दागिन्यांची बॅग सापडली.