तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तरसभेत सर्वाधिक लक्ष्य हे पवार, पवार आणि पवार यांनाच केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि अन्य काहींना. पण त्यात त्यांनी “शरद पवार आपल्या भाषणात शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणतात. ते योग्यही आहे. पण ते कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असं म्हणत नाहीत. कारण, त्यांना मुस्लिम मतं दुरावण्याची भीती वाटते,” असा गंभीर आरोपही केला. त्यामुळे खळबळ माजली आहे. तसं सांगताना त्यांनी पुण्यात घेतलेल्या शरद पवारांच्या मुलाखतीचा दाखला दिला. त्या मुलाखतीत राज ठाकरे यांचे प्रश्न आणि शरद पवार यांची उत्तरे शब्दश: देत आहोत. त्यातून शरद पवार खरंच मुस्लिम मतं दुरावण्याच्या भीतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा भाषणात उल्लेख करत नाहीत की आणखी काय? तसंच ते शाहू-फुले-आंबेडकरांचा खास आवर्जून उल्लेख का करतात, ते आपोआपच स्पष्ट होईल.
वेध मराठी मनाचा…राज ठाकरे यांनी घेतलेली शरद पवार यांची मुलाखत!
राज ठाकरे – आपण जेव्हा इतर राज्यात बघतो.बंगालमधील माणूस रवींद्रनाथ टागोर म्हटलं की एकत्र होतो. पंजाबमधील माणसं गुरु नानक म्हटलं तर एकत्र येतो. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे असे काही हुक आहेत, ज्यामुळे सर्व माणसं, सर्व समाजातील माणसं एकत्र येतात. असा महाराष्ट्रासाठीचा हुक काय वाटतो आपल्याला…ज्यामुळे लोक एकत्र येतील?
शरद पवार – छत्रपती शिवाजी!
हे नाव एक असं आहे, देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही मराठी…आज मी टीव्हीवर पाहत होतो, मराठी माणसांनी शिवजयंती साजरी केली. तिथं शिवाजी महाराजांवरील चित्रपट
राज ठाकरे – साहेब, मग एक मिनिट, मग जेव्हा तुम्ही भाषणाला उभे राहता, तेव्हा शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणता, शिवाजी महाराजांचा का नाही म्हणत?
शरद पवार – शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचाच महाराष्ट्र आहे, त्याबद्दल कुणाच्या मनात शंकाच नाही. ती चिरकाल अशा प्रकारची गोष्ट आहे. शाहू-फुले-आंबेडकरांचा प्रकर्षानं उल्लेख करण्याचं कारण महाराष्ट्र एकसंध ठेवण्या संबंधीची काळजी आहे. हे तीन लोक अशी आहेत, या तीन लोकांनी सामाजिक ऐक्य, सामाजिक प्रबोधन या दोन गोष्टीच्या संबंधी अतिशय कष्ट केले. लोकांना एकसंध ठेवले. खरं सांगायचं तर तुमचे आजोबा, मी त्यांना जवळून बघितले आहे तुमच्या घरीच, प्रबोधनकार ठाकरेंनीसु्द्धा त्या कालखंडामध्ये सामाजिक ऐक्य, सांप्रदायिक विचार बाजूला फेकून देण्यासाठी प्रचंड योगदान दिलं. त्यांची भाषा तिखट होती. तुम्ही लोक नेहमी सांगता ना आमची भाषा ठाकरी भाषा. त्या ठाकरी भाषेचा अनुभव आम्हालासुद्धा खूप आहे. त्या ठाकरी भाषेतून समाजातील विघातक प्रवृत्तीविरोधात त्यांनी ती भाषा वापरलेली. फुले आंबेडकर आणि शाहू राजे यांनीसुद्धा संबंध समाजमन एकसंध एकत्र करण्यासाठी जात धर्म याचा लवलेष सुद्धा न राहता त्याची काळजी घेतली. आजही त्याची गरज आहे. मध्यंतरी आपल्या राज्यात जे प्रकार घडले ते प्रकार हेच सांगतात, आजसुद्धा आपल्याला फुल्यांचा, आंबेडकरांचा, शाहू महाराजांच्या विचारांचे स्मरण करून देण्याची गरज आहे. ते जर नाही केलं, आणि जर हा संघर्ष झाला तर महाराष्ट्र दुबळा होईल. काही झालं तरी महाराष्ट्र दुबळा होऊ द्यायचा नाही. राजकारण असेल नसेल, सत्ता असेल नसेल.महाराष्ट्र हा मजबूतच झाला पाहिजे. तो मजबूत ठेवण्याची ताकद या विचारात आहे. म्हणून यांचा उल्लेख!
राज ठाकरे – पण आज पवारसाहेब आपल्याला चित्र असं दिसतंय, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक महापुरुषाकडे प्रत्येकजण महाराष्ट्रात जातीनं पाहतो, हे बदलणं गरजेचं वाटत नाही का या परिस्थितीतून.
शरद पवार – हो. खरं सांगायचं. एक गोष्ट मला सांगायची, पण एका बाबतीत मी तुमच्याशी सहमत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांकडे महाराष्ट्रात जातीनं कोणी बघितलेलं नाही.
राज ठाकरे – प्रश्न असा आहे की आपण जातीनं पाहत नाही, पण काहीजण त्याकडे जात म्हणून बघतात.
शरद पवार – महाराष्ट्राच्या बाहेर, थोडंस तेथे, माझ्या बाबतीत तिथं म्हणतात मराठा स्ट्रॉंगमॅन. तेथे हा शब्द जातीवाचक नाही. मराठा शब्द तिथं जातीवाचक याने म्हटला जात नाही. जो महाराष्ट्रातील, जो मराठी तो तिथं मराठा!
राज ठाकरे – या सगळ्या गोष्टींची सुरुवात म्हणजे ज्या सर्व समाजाला एकत्र घेऊन जो एक सैन्य लढा उभा केला आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी. आज त्यांच्याच भूमीमध्ये आज जाती जाती मध्ये जो कडवटपणा आलेला आहे तो दूर होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
शरद पवार – खर सांगायचं तर फुले- आंबेडकरांचा आणि शाहू महाराजांचा विचार हाच तरुण पिढीला दिला पाहिजे. त्यांच्यामध्ये मराठी अस्मिता आणि राष्ट्राची अस्मिता ह्यांच्याबद्दल अधिक बिंबवण्याची गरज आहे
राज ठाकरे – म्हणजे मी करतोय ते बरोबर करतोय?
शरद पवार – पुन्हा मी सांगतोय तुम्ही करणार. कारण तुमच्यात ते संस्कार आहेत. आणि त्याच कारण अस आहे की राजकीय मतभेद असले तर बाळासाहेब ठाकेरेंची एक गोष्ट तुम्हाला सांगतो आणि ती या राज्यात कोणीही करू शकणार नाही. बाळासाहेब ठाकरे एकमेव असे राजकीय नेते होऊन गेले, त्यांनी औरंगाबाद मध्ये खैरे सारख्या एक सुतार समाजातल्या एका व्यक्तीला महाराष्ट्राचा मंत्रिमंडळात मंत्री केलं. देशाचा पार्लमेंटमध्ये ५ वेळा पाठवले. त्यांच्या जातीची तिथ ५ हजार मतं सुद्धा नाही आहेत. पण बाळासाहेबांच वैशिष्ट्य होतं जात कधी त्यांनी बघितली नाही. पण कर्तृत्व बघितलं. बाळासाहेबांनी अशी अनेक माणसं महाराष्ट्रातनं उभी केली. मराठी माणसाच्या मनामध्ये त्या व्यक्तीकडे बघत असताना त्यांची जात बघू नका कर्तृत्व बघा आणि मी कर्तृत्वाचा पुजारी आहे हा विचार बाळासाहेबांनी मांडला. त्या मुळे वेगवेगळ्या समाजतल्या वेगवेगळ्या, मला आठवत की त्या वेळेला अंबरनाथच्या जवळ एक मुस्लिम समाजातला साबिर शेख मुस्लिम समाजातला त्याला मंत्रिमंडळात त्यांनी घेतलं होतं. म्हणजे कधी ही जात धर्म हे त्यांचा पुढे आडवे आलं नाही .
राज ठाकरे – आज का महाराष्ट्रात ही परिस्थिती आली आहे ?
शरद पवार – त्याचा कारण अस आहे कि आज दुर्देवाने काही जातीवाचक संघटना या कुठे ना कुठे वारसा करायला लागल्या आहेत. आणि त्याला प्रशासनाकडून प्रशासन ह्याचा अर्थ शासकीय प्रशासन यत्रणा मी म्हणत नाही, सत्तेत बसलेल्या काही घटकांकडून प्रोत्साहन मिळतंय आणि त्याच्यात अंतर निर्माण करून कप्पे निर्माण करून तो कप्पा आपल्याबाजूला घेता आला, तर आपल्या पुढ्यातील राजकारण हे यशस्वी होईल ही भावना वाढीस लावण्याच काम हे केलं जातंय आणि त्याचामुळे दुर्देवानं हे वाढतंय. पण मला हे फार दिवस टिकेल अस नाही वाटत महाराष्ट्र शेवटी या रस्त्याने जाणार नाही. तर शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी जाईल याबद्दल माझा मनात शंका नाही.
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)
पाहा व्हिडीओ:
वाचा:
राज ठाकरेंच्या उत्तर सभेत राष्ट्रवादी आणि पवारच मुख्य लक्ष्य!
राज ठाकरेंच्या उत्तर सभेत राष्ट्रवादी आणि पवारच मुख्य लक्ष्य!