मुक्तपीठ टीम
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आणि कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी वनवन फिरणाऱ्या आशा सेविका आणि गट प्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांनी मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी आजपासून संप करत आहेत. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खंत व्यक्त केली आहे. कोरोनाच्या संकटाला तोंड देत असताना सुद्धा आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना आपल्या मागण्यांसाठी संप पुकारण्याची वेळ येणे हे अतिशय दुर्दैवी आहे, असे फडणवीस म्हणाले.
आज राज्यातील ७२ हजार आशा सेविकांनी संप पुकारला आहे. यावर फडणवीस म्हणाले की, कोरोनाच्या संकटाला तोंड देत असताना सुद्धा आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना आपल्या मागण्यांसाठी संप पुकारण्याची वेळ येणे हे अतिशय दुर्दैवी आहे. कोरोना काळात या सेविका अतिशय उत्कृष्ट काम करीत आहेत. समाधानकारक मानधन, विम्याचे कवच अशा प्राथमिक मागण्या त्यांच्या आहेत.
फडणवीस पुढे म्हणाले की, माझी राज्य सरकारला विनंती आहे की, त्यांनी या सर्व मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना दिलासा द्यावा. त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा संप लवकर मिटेल, यादृष्टीने तातडीने पाऊले उचलावीत!