मुक्तपीठ टीम
फेसबुकचे फोटो शेअरिंग अॅप – इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी अफगाणिस्तानमधील सद्य परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार तालिबान ही संघटना फेसबुकच्या धोकादायक संघटनांच्या यादीत आहे आणि म्हणून या गटाचा प्रचार किंवा प्रतिनिधित्व करणारा कन्टेंट फेसबुकवरून काढून टाकला जात आहे. अफगाणिस्तानात तालिबान्यांनी कब्जा केल्यापासून परिस्थिती बिकट आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन फेसबुक तालिबानला प्रोत्साहन देणारा कन्टेंट आपल्या प्लॅटफॉर्मवरून लवकरात लवकर काढून टाकत आहे. फेसबुक इंककॉर्पोरेटेडच्या एक्झिक्युटिव्हने सांगितले की तालिबानला प्रोत्साहन देणारा सर्व कन्टेंट जलदरीत्या त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकत आहेत.
फेसबुकचे धोरण तालिबानविरोधी!
“धोकादायक किंवा अगदी तालिबानशी संबंधित कोणतीही गोष्ट सक्रियपणे प्लॅटफॉर्म वरून काढुन टाकण्याच्या धोरणावर आमचा विश्वास आहे.” असे मोसेरी म्हणाले. आता ही परिस्थिती झपाट्याने बदलत आहे, आणि त्यामुळे जोखीम देखील वाढेल. आपण करत असलेल्या गोष्टी मॉडिफाय कराव्या. या वाढत्या अडचणींना आपण कसे सामोरे जातो हे महत्वाचे आहे असे ते म्हणाले.
अफगाणिस्तानात भयावह परिस्थिती
- अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा कब्जा झाल्यापासून हजारो लोक अफगाणिस्तानातून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
- कोणतीही वस्तू न घेता लोक देश सोडून पळून जात आहेत.
- दुसरीकडे काबुल विमानतळावर प्रचंड गर्दी जमली आहे, ज्यामुळे तेथे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
- गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकन सैनिकांना वेळोवेळी हवेत गोळीबार करावा लागत आहे.
- विमानतळ सुरक्षित करण्यासाठी आणि अमेरिकन नागरिकांना तसेच स्थानिक पातळीवर कार्यरत कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना बाहेर काढण्यासाठी पावले उचलली जात आहेत.
- माजी राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देशातून पळून जाताना त्यांच्यासोबत चार कार आणि एक हेलिकॉप्टर रोख रकमेने भरले होते, असे रशियाच्या एका वृत्तसंस्थेने सांगितले.