मुक्तपीठ टीम
भारत सरकारच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाने २९ ऑगस्ट २०१८ रोजी ४०% किंवा अधिक दिव्यांगता असणाऱ्या व्यक्तींसाठी लेखी परीक्षा घेण्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. ( ८ फेब्रुवारी २०१९ च्या शुध्दीपत्रासह त्या वाचाव्यात.)
विकाश कुमार वि. संघ लोकसेवा आयोग या खटल्यासंबंधाने ११ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या आदेशान्वये, सर्वोच्च न्यायालयाने विभागाला, ४०% पेक्षा कमी दिव्यांगता असणाऱ्या व्यक्तींना किंवा वैद्यकीय कारणाने लेखनास अक्षम ठरणाऱ्या व्यक्तींना लेखनिक घेऊ देण्याची परवानगी देण्याविषयी मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे आदेश दिले. या सूचना तयार करताना लोकांकडून सूचना मागविण्याचेही न्यायालयाने सुचविले होते.
दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापित केलेल्या समितीने दिलेल्या शिफारशींच्या आधारे विभागाने मार्गदर्शक सूचनांचा एक मसुदा तयार केला असून तो पुढील लिंकवर उपलब्ध आहे-
Revised_Draft Guidelines.pdf – Google Drive
अशा उमेदवारांसाठी लेखी परीक्षेत लेखनिक किंवा भरपाईचा अधिकचा वेळ देण्याची सुविधाही, या मार्गदर्शक सूचनांच्या मसुद्यात करण्यात आली आहे. लेखनिकाची गरज आहे किंवा नाही हे ठरविणाऱ्या वैद्यकीय प्राधिकरणाची रचनाही यामध्ये सांगण्यात आली आहे.
विभागाने या मसुद्यावर लोकांकडून सूचना मागविल्या असून त्यानंतरच त्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. यासाठी लोकांनी १ जून २०२१ पर्यंत आपल्या सूचना- ‘संचालक, धोरण कक्ष, दिव्यांग सक्षमीकरण विभाग,सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार’ -यांना kvs.rao13@nic.in या ई-मेल पत्त्यावर त्या पाठवायच्या आहेत.