मुक्तपीठ टीम
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गुरुवारी मुंबईत १९ हजार ७८० कोरोनाच्या नवीन रुग्णाची नोंद झाली आहे. आतापर्यंत तिसऱ्या लाटेनं शिखर गाठलेलं नाही. त्याआधीच उद्भवत असलेली परिस्थिती ही खूपच चिंताजनक मानली जात आहे. इतकेच नाही तर मुंबईचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी दरही झपाट्याने ३० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. याचा अर्थ मुंबईत ज्या लोकांची कोरोना चाचणी केली जात आहे त्यापैकी प्रत्येक तिसरा व्यक्ती पॉझिटिव्ह येत आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने महाराष्ट्रातील आकडा खूप वाढला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३६,२६५ वर पोहोचली आहे, जी गेल्या ८ महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे. यापूर्वी १४ मे रोजी राज्यात ३९,९२३ रुग्ण आढळले होते. अशाप्रकारे महाराष्ट्र आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उच्चांक ओलांडण्याच्या मार्गावर आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीमध्येही कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. गुरुवारी धारावीत एकाच दिवसात १०७ नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या सुरुवातीपासून धारावीमध्ये एका दिवसात आढळून आलेली ही सर्वात मोठी संख्या आहे.
महाराष्ट्रात झपाट्याने वाढणारी कोरोनाची आकडेवारी भयावह आहे, मात्र रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या अजूनही कमी आहे, ही दिलासादायक बाब आहे. यामुळेच सरकार जास्त निर्बंध लादण्याचा विचार करत नाहीये. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘सध्या लोकल गाड्या थांबवण्याचा कोणताही विचार सुरू नाही. याशिवाय एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यावर कोणतेही निर्बंध घालण्याचा विचार नाही. मात्र, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या की, शहरात २० हजारांहून अधिक कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले तर लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो.