मुक्तपीठ टीम
स्वप्न वाटावं असंच सारं. पण तसं प्रत्यक्षात आहे. एक सरकार सांगतेय. या आमच्याकडे स्थायिक व्हा. फक्त बारा रुपयात तुम्हाला घर दिले जाईल. एवढंच नव्हे तर तुम्हाला त्या देशात नव्यानं जीवन सुरु करण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत म्हणून तीन लाखाची मदतही केली जाईल. अर्थात लोकसंख्या अगडबंब असलेल्या आपल्या देशातील ही बातमी नसून परदेशातील आहे, हे तुम्ही ओळखलं असेलच!
युरोपातील क्रोएशियामध्ये १५०० चौरस फूट भागात पसरलेली घरे अवघ्या १२ रुपयांना विकली जात आहेत. खरं तर, क्रोएशियाच्या उत्तरेकडील भागात लेग्राड नावाचे एक शहर आहे. हे शहर ६२ चौरस किमीवर पसरलेले आहे. सहसा भारतात इतक्या मोठ्या भागात पसरलेल्या शहराची लोकसंख्या लाखोंमध्ये असते. परंतु सध्या या शहरात फक्त २२४१ लोक राहतात.
लेग्राडचे महापौर इव्हान साबोलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या शहरात वाहतुकीची कोणतीही समस्या नाही. शहरातील लोकसंख्या कमी होऊ नये, म्हणून रिकामी घरे फक्त १२ रुपयांमध्ये विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत १७ घरे विकली गेली आहेत. परंतु ही घरे खरेदीदारांना करार करूनच विकली जात आहेत. त्याअंतर्गत खरेदीदारांना किमान १५ वर्षे या शहरात राहावेच लागणार आहे.
लेग्राडची सीमा हंगेरीशी जोडलेली आहे. सर्वत्र जंगल आहे. सुमारे १०० वर्षांपूर्वी अॅस्ट्रो आणि हंगेरियन साम्राज्य फुटल्यानंतर इथली लोकसंख्या कमी होत गेली. अलीकडेच १९ कुटुंबे आपली घरे सोडून राजधानी झाग्रेब येथे स्थलांतरित झाली आहेत. यातील काही घरे मोडली आहेत. कोणाला ही घरे खरेदी करायची असतील तर प्रशासन त्यांच्या खर्चाने घरांची दुरुस्तीही करेल. याशिवाय येथे नवीन जीवन सुरू करण्यासाठी ३ लाख रुपये देखील दिले जातील.
इव्हान सबोलिक म्हणाले की, “ही घरे फुकट मिळाण्यासारखी आहेत. लोक येथे येतात, परंतु थोड्या वेळाने ते तिथून निघून जातात. म्हणूनच, घर खरेदीदारांना १५ वर्षांचा करार करावा लागेल. जेणेकरून लोक येथेच राहतील, त्यामुळे शहर लोकांनी भरलेले दिसू शकेल.