मुक्तपीठ टीम
एपिलेप्सी हा मेंदूसंबंधीत आजार आहे. फिट येणं, आकडी, मिरगी अशा शब्दांनीही एपिलेप्सीला बोली भाषेत संबोधले जाते. या आजाराला मराठीमध्ये अपस्मार असे म्हणतात. मेंदूतील रासायनिक व विद्युत कंपन लहरींचे संतुलन बिघडल्याने असे होते. या आजाराविषयी नीट माहिती घेणं, गैरसमज दूर करणं यातून उपचारांविषयीची जागरुकता वाढेल आणि त्याचा उपयोग रुग्णांना होईल.
अपस्मार म्हणजे एपिलेप्सीची लक्षणे-
- पेशंट अचानकपणे तोल जाऊन खाली बेशुद्ध होऊन पडतो.
- स्नायू एकदम घट्ट आणि कडक होतात, झटका येतो.
- शरीराच्या विचित्र हालचाली होतात.
- दातखिळी बसते.
- तोंडातून फेस येऊ लागतो.
- डोळे फिरविणे
- साधारणात: एक ते तीन मिनिटापर्यंत रुग्ण बेशुद्ध असू शकतो. त्यानंतर ती व्यक्ती शुद्धीवर येते.
एपिलेप्सी कारणे-
- मानसिक ताण-तणाव
- अपूर्ण झोप
- रक्तदाब वाढल्यास
- रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यास
- स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळच्या काही समस्यांमुळे
- Anti-psychotic किंवा Anti- depressant औषधांच्या दुष्परिणामामुळे
- डोक्याला मार लागल्यामुळे
एपिलेप्सीचे निदान-
- मेंदूरोग तज्ज्ञाकडून सल्ला घेणे.
- पेशंटची हिस्ट्री, शारीरिक तपासणी आणि E.E.G (Electroencephelography), MRI स्कॅन, CT स्कॅन इ. चाचण्या करून याचे निदान केले जाते.
- एपिलेप्सी आजार उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून एपिलेप्सीचे निदान झाल्यानंतर आधी Anti-epileptic औषधे सुरू केली जातात.
- औषधांनी जर एपिलेप्सी नियंत्रणात येत नसल्यास मेंदूवरील सोपी आणि सुटसुटीत शस्त्रक्रियने (Operation) एपिलेप्सीवर यशस्वी उपचार होऊ शकतात.
झटका आल्यास काय करावे?
- स्वतः शांत राहा व भयभीत होऊ नका.
- बेशुद्ध येऊन पडलेल्या रुग्णास जबरदस्तीने हलवू नका.
- रुग्णाला डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपवावे,
- जेणेकरून रुग्णाच्या तोंडात अडकलेली लाळ किंवा फेस बाहेर पडून जाईल.
- नंतर रुग्णाला पाठीवर झोपवावे व त्याच्या डोक्याखाली उशी ठेवावी.
- काहीही प्यायला देऊ नका
- इजा पोहोचतील अशा वस्तू आजूबाजूला ठेवू नका
- साधारण दोन ते तीन मिनिटे रुग्ण बेशुद्ध राहतो.
- थोड्या वेळात रुग्ण आपोआप शुद्धीवर येतो.
एपिलेप्सी रुग्णासाठी महत्त्वाच्या सूचना –
- डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत.
- नियमित डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी .
- पुरेशी झोप घ्यावी.
- योगा, प्राणायाम, ध्यानधारणा करावी. नियमित व्यायाम करावा.
- चहा , कॉफी , सिगारेट , बीडी , तंबाखू आणि अल्कोहोल यांचे सेवन करणे टाळा .
- रुग्णाने आपल्या खिशामध्ये आपले नाव , पत्ता , घरातील फोननंबर आणि Epilepsy रुग्ण असल्यासंबंधी माहिती लिहिलेली चिट्टी ठेवावी .
- या चिठ्ठीमध्ये फेफरे आल्यास आजूबाजूच्या लोकांनी काय करावे याविषयीची माहिती लिहिलेली असावी .