मुक्तपीठ टीम
पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमध्ये झालेल्या अपघातात ४४ वर्षीय इलेक्ट्रिशियनचा मृत्यू झाला. इलेक्ट्रिशियन संतोष गुंजाळ यांचा अपघात होऊन मृत्यू झाला. या दुर्घटनेचे तीव्र पडसाद सर्व कामगार आणि कर्मचा-यांमध्ये उमटले आणि सर्वांनी शुक्रवारी सकाळपासून काम बंद आंदोलन केले. या वर्कशॉपमधील ‘आरएसी शॉप’मध्ये कामगार आणि कर्मचा-यांनी काम बंद केले. वर्कशॉपच्या प्रांगणात अनेक कामगारांनी आपल्या उमद्या सहका-याला श्रद्धांजली वाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. यामुळे रेल्वे प्रशासनाचे धाबे दणाणले.
ही दुर्घटना झाल्याचे कळल्यानंतर प. रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कन्सल यांनी मध्यरात्रीनंतर १ वाजता वर्कशॉपला तातडीने भेट दिली. या प्रकरणाची योग्य चौकशी करण्यासाठी कारखाना निरीक्षकांनाही आदेश कन्सल यांनी दिले आहेत.
गुंजाळ १४ जुन २०१३ रोजी ‘ओएच’ कॅटेगरीतंर्गत ग्रेड ‘डी’ मध्ये कामावर रुजू झाले होते आणि १२ जुलै २०१९ रोजी त्यांना कायम स्वरुपी नोकरी मिळाली व त्यांनी ‘टेक्नि ग्रेड ३ ’मध्ये कामाला सुरुवात केली होती. गुरुवारी सायंकाळी ते आरएसी शॉपमध्ये ते काम करत असताना शिडीवरुन खाली पडले आणि त्यांना जबरदस्त मार बसल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले. नंतर प. रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयात पुढील उपचारांसाठी नेण्यात आले. अपघातानंतर ३० मिनिटे ते रुग्णालयात होते. दुदैवाने सायंकाळी ७ वाजता त्यांची जीवनज्योत मालवली.
गुंजाळ यांना शक्य तितक्या लवकर सर्वोत्कृष्ट वैद्यकीय मदत पुरवली दिली असतानाही ते जबरदस्त दुखापतींमुळे बळी गेले, अशी माहिती त्यांच्या सहका-यांनी दिली. रेल्वेच्या ‘पीसीएमई’ने याप्रकरणी अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत.
प. रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी रात्री अपघातस्थळी भेट देऊन दुघर््ाटनेचा आणि कार्यशाळेतील सर्व सुरक्षा व्यवस्थेचा बारकाईने आढावा घेतला. वैद्यकीय मदत वेळेवर उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी चौकशी केली. गुंजाळ यांच्या कुटुंबाला सर्व प्रकारची मदत करण्यासाठी महाव्यवस्थापकांनी ‘पीसीएमई’ना आदेश दिले आहेत. दरम्यान, प्रशासनाने मृत कर्मचा-यांच्या कुटुंबीयांना सर्व कायदेशीर फायदे दिले आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.