मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चाहूल लागलेली असतानाही भारतातील राजकीय नेत्यांनी निवडणुकीच्या राजकारणाला महत्व दिले. लाखोंची गर्दी गोळा करत पाच राज्यांमधील निवडणूक प्रचाराला महत्व दिलं गेलं. आता त्याचे साइड इफेक्ट दिसत आहेत. सर्वात मोठा फटका सर्वात जास्त मतदानाच्या फेऱ्या असलेल्या पश्चिम बंगालमध्ये जाणवत आहे. बंगालची राजधानी कोलकाता आता कोरोनाची राजधानी झाले आहे. तेथे कोरोनाची आरटी-पीसीआर चाचणी होत असलेल्या प्रत्येक दोनपैकी एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळत आहे. त्याच वेळी, बंगाल राज्यात प्रत्येक चारपैकी एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आहे.
नेत्यांचा प्रचार गर्दीचा फंडा, कोरोनाचा फैलाव मोठा!
- बंगालच्या निवडणुकीला इतर चार राज्यांपेक्षा सर्वात जास्त महत्व होतं.
- भाजपाने सत्तारुढ तृणमूल काँग्रेसची सत्ता हिसकावून घेण्यासाठी संपूर्ण बळ लावलं आहे.
- तृणमुल काँग्रेसनेही भाजपाला रोखून सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे.
- या अटीतटीच्या सामन्यात कोरोनाकडे दुर्लक्ष करुन नेत्यांनी गर्दी जमवण्यावरच लक्ष ठेवलं.
- त्याचा दुष्परिणाम आता दिसत आहे. कोलकात्यात पॉझिटिव्ह येणाऱ्यांची आताची संख्या मागील महिन्यापेक्षा पाच पट जास्त आहे.
- एका महिन्यापूर्वी २० कोरोना तपासणीत केवळ एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला. आता दोनापैकी एक!
निवडणुकीचा प्रचार ज्वर आणि कोरोनाचा ताप सारखाच वाढला…
- बंगालमध्ये १ एप्रिल रोजी २५,७६६ लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती, त्यामध्ये केवळ १२७४ लोक पॉझिटिव्ह आढळले. हा पॉझिटिव्ह दर ४.९ टक्के होता.
- नुकतीच ५५,०६० लोकांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी १४,२८१ लोक पॉझिटिव्ह आढळले. हा दर २५ टक्के आहे.
- काही प्रयोगशाळांमध्ये तपासणी करणाऱ्यांमध्ये पॉझिटिव्ह लोकांचे प्रमाण ५५ टक्क्यांपर्यंत गेले आहे.
- कोरोना रुग्णांची संख्या वाढून ७,२८,०६१ झाली आहे.
- कोरोनामुळे मृतांची संख्या १०,८८४ वर गेली आहे.
कोरोनाकडे निवडणूक आयोगाचीही डोळेझाक
- पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत.
- निवडणूक आयोग यावेळी आठ टप्प्यात निवडणुका घेत आहे.
- शेवटचे तीन टप्पे एकत्र करण्याची मागणी तृणमूल काँग्रेसने केली होती, पण आयोगाने ती फेटाळली.
- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रचारसभा रद्द केल्या.
- त्यानंतर भाजपाने आपले प्रचार कार्यक्रम मर्यादित स्वरुपात करण्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची जाहीर सभा नुकतीच रद्द केली.
- आता शेवटच्या टप्प्याच्या सात दिवस आधी, निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये रोड शो आणि वाहनांच्या मोर्चावर त्वरित परिणाम म्हणून बंदी घातली आहे.
- जास्तीत जास्त ५०० लोकांना निवडणुकीत उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.
- हे घडलं ते कोलकात उच्च न्यायालयाने कोरोना सुरक्षा नियम पाळले जात नसल्यामुळे निवडणूक आयोगाची कान उघडणी केल्यानंतर.