मुक्तपीठ टीम
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपाबरोबर युती करण्याची अट शिंदे यांनी घातल्याने महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह सूरतमधून आज सकाळी गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. गुवाहाटी विमानतळावर दाखल होताच एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सेना आमदारांनी कोणतंही बंड केलेलं नाही किंवा आम्ही पक्षही सोडलेला नाही, असे सांगितले. त्यामागे शिवसेना विधिमंडळ पक्षच ताब्यात घेण्याची रणनीती असण्याची शक्यता आहे. म्हणजे विधिमंडळात एकनाथ शिंदेंचाच शिवसेना पक्ष खरा, असा दावा केला जाईल.
शिवसेनेचे ४० आमदार माझ्यासोबत, एकनाथ शिंदेंचा दावा!
- शिवसेनेचे ४० आमदार माझ्यासोबत आहेत.
- आम्ही सर्व जण बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि भूमिका पुढे घेऊन जाणार आहोत.
- मला कोणावर टीका करायची नाही.
- इथे शिवसेनेचे आमदार आहेत आणि आम्हाला बाळासाहेबांचे हिदुत्व पुढे घेऊन जायचे आहे.
- माझ्यासोबत ४० आमदार इथे आले आहेत आणि आणखी १० येणार आहेत.
बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेणार असल्याचा पुनरुच्चार…
- शिवसेनेने कुठलेही बंड केलेले नाही.
- शिवसेना आमदारांनी कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही.
- बाळासाहेबांचे आणि हिंदुत्वाचे विचार यापासून शिवसेना आमदार कधीही फारकत घेणार नाहीत.
- मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झालेली आहे.
- बाळासाहेबांचा नारा हा बुलंद केला जाईल. बाळासाहेबांचे हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत.
कायदा काय सांगतो?
- एकनाथ शिंदे शिवसेना सोडणार नाही, असं म्हणणं हे शिवसेनेच्या नेतृत्वासाठी जास्त धोकादायक ठरू शकतं.
- जर शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी १/३ म्हणजे ३७ आमदारांचं बळ एकनाथ शिंदेंकडे असेल, तर त्यांच्या सोबत बंड केलेल्या आमदारांची पदं वाचतील.
- तेवढेच नाही तर एकनाथ शिंदेंकडे शिवसेना विधिमंडळ पक्षातील २/३ आमदार त्यांच्यासोबत असल्याने त्यांच्या गटाला शिवसेना विधिमंडळ पक्ष म्हणून मान्यता मिळेल.
- त्याचवेळी शिवसेनेशी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या आमदारांचं स्थान वेगळा गट असेल.
- मात्र, एकनाथ शिंदे दावा करत असले तरी त्यांच्याकडे ३७ आमदार आहेत का, हा महत्वाचा मुद्दा आहे.
- कारण सध्या त्यांच्यासोबतचे गीता जैन, बच्चू कडू, राजकुमार पटेल आणि अन्य काही आमदार हे शिवसेनेच्या कोट्यात मोजले जाणार नाहीत.
- तसेच आता त्यांच्या सोबत असलेले सर्व आमदार नंतरही त्यांच्यासोबतच राहतील का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
- त्यामुळे एकनाथ शिंदेंकडून ३७ या २/३ आमदार संख्येपेक्षा जास्त म्हणजे ४०पर्यंत निव्वळ शिवसेना आमदारांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी शक्यता आहे.
- त्यामुळे इतरांना आपल्यासोबत घेण्यासाठी आताच जास्त आमदारांची संख्या वाढवून वातावरण निर्मिती केली जात असण्याची शक्यता आहे.