मुक्तपीठ टीम
एकनाथ शिंदे राज्याचे नगरविकास मंत्री. त्याचबरोबर सार्वजनिक उपक्रमांचे बांधकाम मंत्री. शिवसेनेच मानाचं आणि महत्वपूर्ण मानल्या जाणारे शिवसेना नेते हे संघटनात्मक पदही त्यांच्याकडे. आता त्यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचे सध्या तरी तेच केंद्रबिंदू झालेत. पण एकनाथ शिंदेंचा प्रवास हा थेट इथपर्यंत झालेला नाही.
अतिशय सामान्य परिस्थितीतील मूळ सातारकर पण ठाण्यात जीवन घडवणाऱ्या एकनाथ शिंदेंना शिवसेनेचा परिसस्पर्श झाला आणि त्यांचे जीवनच बदलले. त्यात मोठी भूमिका बजावली धर्मवीर आनंद दिघे या कडवट शिवसेना नेत्यानं. त्यांचे आशीर्वाद लाभल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा सामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यापर्यंतचा प्रवास शक्य झाला आहे.
शिवसेनेचे नेते, आणि ठाण्यातील राजकारणातील अखेरचा शब्द मानले जाणारे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेतील कार्यकाळ कसा आहे हे जाणून घेऊया…
एकनाथ शिंदे शिवसेनेतील महत्वाचे नेते
- एकनाथ शिंदे महाराष्ट्र सरकारचे नगरविकास मंत्री आहेत.
- एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासूनच शिवसेनेशी संबंधित असून ते सध्या ठाण्यातील पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.
- ते २००४, २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये सलग ४ वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले आहेत.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जायचे आणि त्यांना ‘मातोश्री’चे निष्ठावंत म्हटले जायचे.
एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेतील झंझावाती प्रवास!
- एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला.
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १९७०-८० च्या दशकातील महाराष्ट्रातील इतर तरुणांप्रमाणेच एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा प्रभाव होता.
- तो काळ ठाण्यासाठी जिल्हाप्रमुख आनंद दिघे या धर्मवीराचा होता.
- त्यांच्या नेतृत्वाखाली १९८० च्या दशकात ते शिवसैनिक म्हणून सक्रिय झाले.
- प्रवेश केला आणि किसन नगरचे शाखाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
- तेव्हापासून ते सामाजिक आणि राजकीय विषयांवर पक्षाच्या अनेक आंदोलनांमध्ये आघाडीवर होते.
- १९९७ मध्ये ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना नगरसेवकपदाचे तिकीट दिले आणि ते प्रचंड बहुमताने विजयी झाले.
- २००१ मध्ये त्यांची ठाणे महापालिकेत सभागृह नेतेपदी निवड झाली आणि २००४ पर्यंत ते या पदावर राहिले.
धर्मवीर आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर एकनाथ शिंदेंनी कायम राखली निष्ठा
- २६ ऑगस्ट २००१ रोजी धर्मवीर आनंद दिघे यांचा आकस्मित मृत्यू झाला.
- जमावाने त्यांच्यावर उपचार सुरु असलेल्या रुग्णालयात जाळपोळ केली. त्यांचा राग शिवसेना नेत्यांवरही होता.
- ठाण्यात शिवसेनेविरोधात प्रचंड नाराजी निर्माण झाली.
- पण त्या अवघड प्रसंगी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी, ठाकरे घराण्याशी निष्ठा राखत ठाणे राखले. ठाण्यावर शिवसेनेचा भगवा फडकत ठेवला.
- २००४ मध्ये एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणे विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली आणि ते प्रचंड बहुमताने विजयी झाले.
- एकनाथ शिंदे यांची २००५ साली शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती झाली होती.
- त्यानंतर २००९, २०१४ आणि २०१९च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले.
- २०१४ च्या निवडणुकीनंतर, एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी आणि नंतर महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.
फडणवीस मंत्रिमंडळात मंत्री झाल्यापासून शिंदेंची झंझावाती कामगिरी
- यानंतर शिवसेना भाजपाशी युती करत सरकारमध्ये सहभागी झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम) मंत्रीपद मिळालं.
- याच मंत्रीपदाच्या काळात एकनाथ शिंदे यांची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे संबंध घनिष्ठ झाले.
- यानंतर त्यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी स्वीकारली.
- सध्या त्यांच्याकडे नगरविकास मंत्री पदाची जबाबदारी आहे. त्याचबरोबर पूर्वीचे सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम) मंत्रीपदही आहे.
- हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामात शिंदेंचा सिंहाचा वाटा आहे.
- मुंबईतील मेट्रोच्या कामासही नगरविकास मंत्री झाल्यापासून त्यांनी गती देण्याचा प्रयत्न केला.
- त्यांच्या याच खात्यातील सेनेच्या काही नेत्यांचा हस्तक्षेप शिंदेंना खटकत होता.
- त्यातच त्यांची महत्वांकाक्षा ही वाढतीच होती. त्यातूनच त्यांनी अखेर शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान देणारं बंडाचं पाऊल उचललं असल्याचं दिसत आहे.