मुक्तपीठ टीम
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने मुंबई व परिसरातील अनेक ठिकाणी धाडी टाकल्या असून आठ खाद्यतेल रिपॅकर्स व घाऊक विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली. सर्व ठिकाणी मिळूण एकूण ४ कोटी ९८ लाख ७४ हजार ९७३ रुपयांचा खादय तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. एकूण ९३ खाद्य तेलाचे नमुणे विश्लेषणार्थ घेण्यात आले आहेत. या धाडीत एकूण ३० अन्न सुरक्षा अधिकारी सामील झाले होते. या धाडीतून समोर आलेले वास्तव धक्कादायक आहे. तेलाचे जे नमुणे अप्रमाणित दर्जाचे म्हणून जप्त करण्यात आले आहेत, त्यांच्यापैकी मोहरी, तिळ अशा आरोग्यदायी मानल्या जाणाऱ्या तेलांचे नमुण्यामध्ये अप्रमाणितचे प्रमाण जास्त आहे.
राज्यातील जनतेच्या आरोग्याची प्रथम जबाबदारी लक्षात घेवून, त्यांच्या दैनंदिन आहारातील परिणामकारक अन्न पदार्थाचा दर्जा तपासण्याची जाणीव लक्षात ठेवून प्रशासनास प्राप्त होणाऱ्या गोपनीय माहितीच्या आधारे धाडी टाकल्या जातात.
राज्यातील अन्न व्यवसायाचा दर्जा उंचावणे तसेच अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षा व मानके कायदयाच्या तरतुदींचे पालन करण्यासाठी मार्गदर्शन करणे हा देखील धाडीचा अन्य हेतू असतो. या धोरणानुसार मुंबई आणि ठाणे परिसरातील काही खादयतेल व्यवसायांवर नुकत्याच धाडी घालण्यात आल्या.
या धाडीत मुंबई परिसरातील
१) मे. आयता एन्टरप्रायजेस प्रा.लि., बोरीवली (पश्चिम), मुंबई-९२
२) मे. अष्टमंगल ऑईल मार्केटींग प्रा.लि.,गोरेगाव (पश्चिम), मुंबई -८६ व ठाणे परिसरातील
३) मे. सदानंद ऑईल टे्डर्स, वसई, जि. ठाणे
४) मे. गौतम एन्टरप्रायजेस, वाशी, नवी मुंबई
५) मे. शिवशक्ती एन्टरप्रायजेस, वाशी, नवी मुंबई,
६) मे. गॅलक्सी एन्टरप्रायजेस, काल्हेर, ता. भिवंडी,
७) मे. गुलाब ऑईल अँड फुड इंडस्ट्रिज, वसई (पूर्व), जि. पालघर आणि
८) मे. आशिर्वाद ऑईल डेपो, मिरारोड, जि. ठाणे
या आठ खाद्यतेल रिपॅकर्स व घाऊक विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली. सर्व ठिकाणी मिळूण एकूण ४,९८,७४,९७३ रुपायांचा खादय तेलाचा साठा जप्त करण्यात आला व एकूण ९३ खादय तेलाचे नमुने विश्लेषणार्थ घेण्यात आले.
धाडीचा उद्देश व परिणाम तपासता यावा म्हणून प्रथम प्राधान्याने विश्लेषण अहवाल मागवण्यात आले. तपासण्यात आलेल्या नमुन्यापैकी मे. गुलाब ऑईल अँड फुड इंडस्ट्रिज, वसई (पूर्व), जि. पालघर या पेढीतुन घेण्यात आलेल्या १४ पैकी १४ नमुने प्रमाणित असल्याचे आढळून आले आहे. तसेच घेण्यात आलेल्या एकूण ९३ खादयतेलाच्या नमुन्यापैकी अप्रमाणित दर्जाचे ४९ नमुने आढळून आले व ४४ नमुने प्रमाणित दर्जाचे आढळून आले.
धक्कादायक! मोहरी आणि तिळ तेलाचे नमुणे सर्वाधिक खराब!
- शेंगदाणा तेलाच्या ११ नमुन्यापैकी ६ नमुने (५४.५५ टक्के) अप्रमाणित असल्याचे आढळून आले.
- मोहरी तेलाच्या १९ नमुन्यापैकी १२ नमुने (६३.१६ टक्के) अप्रमाणित असल्याचे आढळून आले.
- तिळ तेलाच्या ५ नमुन्यापैकी ५ नमुने (१०० टक्के) अप्रमाणित असल्याचे आढळून आले.
- सोयाबिन तेलाच्या ११ नमुन्यापैकी ११ नमुने (१०० टक्के) प्रमाणित असल्याचे आढळून आले.