मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहे. मलिकांच्या नातेवाईकांच्या मालमत्तांचीही चौकशी होणार आहे. ईडीने त्याच्या कुटुंबाच्या नावावर नोंदवलेल्या सर्व मालमत्तांचा तपशील मिळण्यासाठी मुंबई उपनगरच्या निबंधकांना पत्र लिहिले आहे. या पत्रात ईडीने निबंधकांकडे नवाब मलिक, त्यांची पत्नी मेहजबीन आणि मुलगा फराज मलिक यांच्या नावावर नोंदवलेल्या सर्व संपत्तीची कागदपत्रे देण्याची मागणी केली आहे. ईडीने २४ मार्च रोजी हे पत्र लिहिले होते. वास्तविक, ईडीने याआधी मलिक कुटुंबीयांकडून ही सर्व कागदपत्रे मागवली होती. मात्र तेथून कागदपत्रे न मिळाल्याने आता ईडीने निबंधक कार्यालयात धाव घेतली आहे.
मालमत्तेत मलिक यांचा मुलगा फराजच्या नावावर असलेल्या दोन फ्लॅटचा समावेश आहे. गुलामनबी मंझील, सांताक्रूझ (पश्चिम) येथील फ्लॅट क्रमांक ६ आणि वांद्रे (पश्चिम) येथील वांद्रे वास्तू भवन येथील फ्लॅट क्रमांक ५०१ आहेत. ईडीने कुर्ला (पश्चिम) येथील नूर मंझिल येथील फ्लॅट क्रमांक बी-०३, सी-२, सी-१२ आणि जी-८ चे रेकॉर्डही मागवले आहेत. हे फ्लॅट मलिक आणि त्यांची पत्नी मेहजबीन यांच्या नावावर आहेत.
उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल
- भाजपा बदनामी करताना कुठल्याही थराला जात आहे. नवाब मलिकांवर आरोप झाले.
- सिद्ध झाल्यावर बघू त्यांचे काय करायचे. पण तुम्ही ज्याप्रकारे आरोप करत आहेत, हे पाहता ते नवाब मलिक दाऊदचा हस्तक असल्याचे दाखवून त्यांची प्रतिमा मलिन करायची.
- केंद्राच्या यंत्रणांना थाळ्या वाजवा, दिवे लावा हेच करता येते का? इतकी वर्ष मलिक निवडून येत होते. तेव्हा केंद्रीय तपास यंत्रणांना हे दिसले नाही.
- ईडीच्या अधिकाऱ्यांना काहीच माहिती नाही का? माहिती तुम्हीच द्यायची, चौकशी तुम्हीच करायची मग ईडी करतेय काय? ईडी आहे की घरगडी हेच कळत नाही.
- सगळ्या यंत्रणांचा गैरवापर केला जातो.
- पण आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे.