मुक्तपीठ टीम
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यांच्या नागपुरातील घरावर ईडीने छापा टाकला असून झाडाझडती सुरू आहे. सकाळी ८ वाजताच ईडीचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या घरी दाखल झाले आहेत.अनिल देशमुख दिल्लीत असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापे टाकल्यामुळे राजकीय वर्तुळात गदारोळ माजला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटी रुपयांच्या कथित वसुलीप्रकरणात अनिल देशमुख यांना राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आज ईडीने त्यांच्या नागपुरातील घरात छापेमारी सुरु केली आहे. यावेळी अनिल देशमुखांच्या घराबाहेर सकाळपासूच दंगल नियंत्रण पथकाचे जवानही तैनात आहेत.
आज सकाळी ईडीचे पाच अधिकारी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. यावेळी अनिल देशमुख घरी नव्हते, तर त्यांची पत्नी आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते.