मुक्तपीठ टीम
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका पुढे ढकलता येणार नसल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. सर्वोच्च न्यायाल्याच्या निर्देशानुसारच या निवडणुका होत आहेत असे निवडणूक आयोगाने स्पष्टपणे म्हटले आहे. असे असले तरी सर्वोच्च न्यायालयाने जर आदेश दिले तर निवडणूक कार्यक्रमात बदल होऊ शकतो, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका पुढे ढकलण्याची मागणी राज्य सरकारकडून राज्य निवडणूक आयोगाला करण्यात आली होती. आता सरकारची काय भूमिका असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
राज्य सरकारने केली होती विनंती
- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पाच जिल्हा परिषदेत आणि पंचायत समिती मधील राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं होतं.
- रद्द करण्यात आलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
- या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं.
- भाजप नेते आणि ओबीसी संघटनेच्या दबावानंतर राज्य सरकारनं ओबीसी आरक्षणाबाबत अध्यादेश काढला.
- ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे केली होती.
- मात्र या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच घेण्यात येत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला कळवले आहे.
निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
या टप्प्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाशिवाय या निवडणुका थांबवणे शक्य नाही
ही निवडणूक अंतिम टप्प्यात असून ठरल्याप्रमाणे ५ ऑक्टोबर या दिवशी मतदान होणार असून दिनांक ६ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
अशी परिस्थिती असताना आयोगाला या टप्प्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाशिवाय या निवडणुका थांबवणे शक्य होणार नाही, असे आयोगाने स्पष्टपणे म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात काही आदेश मिळाले, तर आयोगाला त्यानुसार पढील कारवाई करणे शक्य होईल.
निवडणूक कार्यक्रम
- या निवडणुकीत जिल्हा परिषदांच्या एकूण ८५ जागांसाठी मतदान होणार असून पंचायत समितीच्या १४४ जागांवर लढत होणार आहे.
- १५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत अर्ज दाखल करता येणार
- सप्टेंबर अर्जाची छाननी होणार
- २९ सप्टेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार
- ५ ऑक्टोबर रोजी होणार मतदान
- ६ ऑक्टोबर रोजी निकाल