मुक्तपीठ टीम
कोरोना संकटात एकीकडे रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरु असताना दुसरीकडे बनावट रेमडेसिवीर विकणारे एक रॅकेट बारामतीत उघडकीस आलं आहे. हे रॅकेट कोरोना सेंटरमधील रेमडेसिवीरच्या इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्या मिळवत असे. त्या रिकाम्या बाटल्यांमध्ये पॅरासिटामॉलचा द्रव भरून ते रेमडिसीवीर इंजेक्शन बनावट म्हणून विकत असे. विशेष म्हणजे हे बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन तब्बल ३५ हजार रुपयांना विकले जात असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यानी रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर बारामती तालुका पोलिसांनी सापळा रचला असता बनावट रेमडेसीवीर विकणारी टोळी जेरबंद झाली.
धक्कादायक बाब अशी की, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आदेशाने झालेल्या कारवाईत जेरबंद झालेल्या या टोळीच्या म्होरक्या दिलीप गायकवाड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा समर्थक म्हणून मिरवत असे.
भाजपानेही अजित पवारांना सवाल विचारत एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
@AjitPawarSpeaks यांच्या बारामतीत त्यांनाच दैवत माननाऱ्यांकडून जनतेची घोर फसवणूक केली जाते. रेमडिसिव्हरच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये पॅरासिटेमॉल भरण्याचे घाणेरडं कृत्य करून जनतेच्या जीवाशी खेळ केला जातो. अजितदादा आता या विकृत लोकांवर कारवाई होणार की, प्रकरण दाबलं जाणार? pic.twitter.com/gipLmMM4oC
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 18, 2021
मती गुंग करणारे बारामतीमधील हे खतरनाक रॅकेट दिलीप गायकवाड, संदीप गायकवाड, शंकर भिसे आणि प्रशांत घरत हे चालवत असत. या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. देशाप्रमाणेच महाराष्ट्रात आणि बारामतीतही रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. या काळात रुग्णसेवेसाठी अनेकजण झटत असताना दुसरीकडे कोरोना संकटात गैरफायदा कोरोनाग्रस्तांना मृत्यूच्या दारात ढकलण्याचा खतरनाक खेळ बारामतीत खेळला जात होता. दिलीप गायकवाड हा मेडिक्लेमचा व्यवसाय करीत असे. त्यामुळे तो वैद्यकीय क्षेत्रातील असल्याचा ग्रह झाल्याने त्याच्याकडे रेमडेसिवीरसाठी चौकशी होत असे. त्यातून त्याच्या डोक्यात आधी रेमडेसिवीरचा काळाबाजार आणि नंतर ते मिळत नसल्याने बनावट बनवण्याची काळी कल्पना आली. तेव्हापासून त्याने बनावट रेमडेसिवीरचा धंदाच सुरु केला.
बारामतीतील एका रुग्णाच्या नातेवाईकाला रेमडेसीवीरची तातडीची गरज असल्याने त्याने या टोळीतील एका सदस्याशी संपर्क साधला. तो एका कोविड सेंटरमध्ये काम करतो. त्याच्याकडे इंजेक्शन असल्याची माहिती गरजूला मिळाली होती. त्यानुसार इंजेक्शन देणाऱ्याने त्याला शहरातील फलटण चौकात बोलावले. एका इंजेक्शनचे ३५ हजार असे दोन इंजेक्शनचे ७० हजार द्यावे लागतील, अशी मागणी केली. पोलिसांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी सापळा रचून या टोळीतील दिलीप गायकवाड, संदीप गायकवाड, प्रशांत घरत, शंकर पिसे यांना अटक केली आणि फॉर्च्यूनर गाडी जप्त केली आहे.
कोरोना सेंटर, पॅरासिटामॉल आणि बनावट रेमडेसिवीरचा काळांधदा!
- चौघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून धक्कादायक माहिती मिळाली आहे.
- राज्यात रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू असते.
- टंचाई असल्याने काळाबाजार सुरू आहे, मात्र तरीदेखील इंजेक्शन मिळत नाहीत.
- याच संधीचा फायदा घेत या टोळीने बनावट रेमडिसिवीर तयार करण्याची योजना आखली.
- दिलीप गायकवाडने संदिप गायकवाड मार्फत कोरोना सेंटरमधील रिकाम्या झालेल्या रेमडेसीवीरच्या बाटल्या मिळवत असे.
- त्या रिकाम्या बाटल्यांमध्ये पॅरासिटीमॉलच्या गोळ्यांचे चूर्ण पाण्यामध्ये मिसळून तयार केलेला द्रव भरत.
- ते द्रव बाटलीत भरुन वरचे अॅल्युमिनियम कव्हर फेविक्विकने बंद केले जात असे.
- बनावट असूनही दिलीप गायकवाड आणि त्याचे टोळके त्यांच्या संपर्काचा वापर करुन पैसेवाले गरजू हेरुन त्यांना तब्बल ३५ हजारालाही विकत असत.
- या टोळक्याने बनावट रेमडेसिवीर ५ ते ३५ हजार रुपयांपर्यंत विकले आहेत.
हे बनावट औषध तयार करून ते विकले जात होते. रुग्णांच्या जीवाशी त्यातून खेळ केला जात होता. याप्रकरणी अन्न व अौषध प्रशासनाकडून तक्रार घेत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली आहे.
अजित पवारांनी दिले काळाबाजार रोखण्याचे आदेश…पकडला गेलेला राष्ट्रवादी समर्थक?
- हे रॅकेट जेरबंद केल्यानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीत रेमडिसिवीरइंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी बारामतीत घेतलेल्या जिल्हाधिकाऱ्यांचे घेतलेल्या आढावा बैठकीत देखील पोलिसांना असा काळाबाजार रोखण्यास सूचना केल्या होत्या.
- त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी उघडकीस आणलेल्या या रॅकेटचा म्होरक्या दिलीप गायकवाड हा स्वत:ला राष्ट्रवादी आणि पवार समर्थक म्हणवून मिरवत असे.
- त्याच्या फॉर्च्युनर गाडीच्या मागच्या काचेवर त्याने शरद पवार आणि अजित पवार यांची मोठी छायाचित्र लावून आमचे दैवत लिहिले होते.
- त्याच्या अटकेनंतर त्या गाडीसह तो उभा असलेले छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
- पोलिसांनी त्याची गाडी पोलीस ठाण्यात आणली तेव्हा मात्र मागच्या काचेवर काहीच नव्हते.
- दिलीप गायकवाडने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छा जाहिरातीत स्वत:चा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता असा केल्याच्या काही इमेजही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, त्या जाहिरातीची सत्यता प्रमाणित झालेली नाही.
- कोरोना लॉकडाऊनच्या काळात इमर्जंसी सर्व्हिस म्हणून विश्ववेदिका सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या नावाने त्यांनी बनवलेली ओळखपत्रेही आहेत.