मुक्तपीठ टीम
कोरोना काळात पतीच्या मृत्यूने विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी सरकारने आर्थिक मदत देत धोरण जाहीर करावे, अशी मागणी डिटीएड बीएड स्टुडंट असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष संदिप कांबळे यांनी केली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाने झालेल्या मृत्यूमध्ये ५० वर्षाच्या आतील पुरुषांच्या मृत्यूमुळे अंदाजे २० हजार महिला विधवा झाल्या आहेत. कोरोनामुळे झालेला दवाखाना खर्च, कर्ज, मुलांची जबाबदारी व संसाराचे ओझे यामुळे या एकल महिलांची स्थिती अतिशय विदारक झाली असल्याचं विदारक वास्तव सरकारनं लक्षात घेणं आवश्यक असल्याचं संदिप कांबळे म्हणालेत.
संदिप कांबळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवलेल्या पत्रातील महत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत:
१) या महिलांच्या पुनर्वसनासाठी सरकारने मदत करण्याची भूमिका घ्यावी. अशी आमची मागणी आहे. दिल्ली, राजस्थान, आसाम, ओरिसा, बिहार या राज्यांनी तातडीने वेगवेगळ्या मदत योजना जाहीर करून विधवांना मदत केली आहे. आसाम सरकार प्रत्येक अशा महिलेला अडीच लाख रुपये व मुलींच्या लग्नाला एक लाख रुपये, दिल्ली सरकार ५०,०००रु व पेन्शन, राजस्थान सरकार एक लाख रुपये व मुलांच्या शिक्षणासाठी मदत, केरळ सरकारचीही एक लाख रु मदत आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यांनी त्या सर्व योजनांचा अभ्यास करून आपल्या राज्यातील महिलांना ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्याची आवश्यकता आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही तसा आदेश दिला आहे.
२) त्याचबरोबर या महिलांचे मालमत्तेवरील हक्क डावलले जाणार नाहीत यासाठी तातडीने आदेश द्यावेत कारण तसे प्रकार घडत आहेत. या महिलांना संरक्षणाची गरज आहे.
३) या तातडीच्या आर्थिकमदती बरोबरच या महिला स्वयंनिर्भर व्हाव्यात यासाठी त्यांना विविध उद्योगांचे प्रशिक्षण देणे,त्यासाठी अल्प व्याजदराने कर्जपुरवठा यासाठीही योजना आखण्याची गरज आहे.त्यातून त्या खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण होतील.
४)शासकीय नियुक्तीत यांना प्राधान्यक्रम द्यावेत. रेशनमधील अंत्योदय योजनेत यांचा समावेश करणे आवश्यक आहे.
५) १५ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत स्तरावर महिलांसाठी असलेला निधी या महिलांवर खर्च करणे, अनुसूचित जाती जमातीच्या निधीतून त्या संवर्गातील अशा महिलांसाठी ती रक्कम खर्च करणे असे आदेश देण्याची गरज आहे.
तरी आपण कृपया तातडीने कोरोनाने एकल केलेल्या महिलांसाठी धोरण जाहीर करावे व तातडीची मदत द्यावी, अशी मागणी संदिप कांबळे यांनी म्हटलंय.