मुक्तपीठ टीम
कोरोनावरच्या उपचारासाठी डीआरडीओकडून तयार केल्या गेलेल्या 2-डीऑक्सी-डी-ग्लुकोज औषधाला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळालेली आहे. त्यानंतर आता याचा पहिला वापर दिल्लीतल्या डीआरडीओ कोरोना रुगणालयात दाखल रुग्णांवर केला जाणार आहे. एक- दोन दिवसात हे औषध रुग्णालयात पाठवलं जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोरोना रोखण्यासाठी हे औषध प्रभावी असल्याचं बोललं जात आहे. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे औषध पावडर स्वरुपात असेल. गेल्या वर्षभरापासून संशोधन आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारावर हे पावडर स्वरुपातलं औषध तयार केलं गेलं आहे.
डीआरडीओ आणि डॉ. रेड्डीज लॅबच्या संयुक्तरित्या औषधनिर्मिती
डीआरडीओ च्या लॅबने हैदराबादची खासगी कंपनी डॉ. रेड्डीज लॅबसोबत मिळून ही औषध निर्मिती केली आहे. वैद्यकीय चाचणीदरम्यान, 2-डीजी औषधाचे 5.85 ग्रॅमच्या पुड्या तयार केल्या गेल्या. यातली एक एक पुडी ही सकाळ-संध्याकाळ पाण्यात मिसळून रुग्णांना दिल्या गेल्या. याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला आहे. ज्या रुग्णांना हे औषध दिलं गेलं त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा दिसून आली आहे. याच आधारावर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या औषधाला आपत्कालीन परिस्थितीत वापराला मंजुरी दिली आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधाचा डोस
देशातल्या २७ रुग्णालयात या औषधाची चाचणी केली गेली. तिथे शिल्लक असलेला साठा गोळा केला गेला आहे. हा औषधांचा साठा दिल्लीतल्या डीआरडीओच्या रुग्णालयात पाठवला जाणार आहे. हे औषध सध्यातरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिलं जाईल. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. रेड्डीज लॅबमध्ये औषध निर्मिती केली जात आहे. येत्या १० ते १५ दिवसात व्यावसायिक वापरासाठीही हे औषध रुग्णालयात पाठवलं जाईल. पण, बाजारात या औषधाच्या विक्रीसाठी डीसीजीआय कडून मंजुरी घेणं आवश्यक आहे. सध्या या औषधाला फक्त आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे.