मुक्तपीठ टीम
आषाढी एकादशीच्या दिवशी यावेळी वारकऱ्यांची नेहमीसारखी गर्दी जमू शकणार नाही. पण मनानं तिथं पोहचलेल्या वारकऱ्यांच्या भावनांमुळे भक्तीचा मेळा तसाच असेल. दरवर्षी लाखोंच्या संख्येनं पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेसाठी आता अत्याधुनिक रुग्णवाहिका असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या सुसज्ज अत्याधुनिक ALS रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात येणाराय.
पंढरपुरातील आरोग्य सेवेला आधुनिकतेसाठी रुग्णवाहिकांची निकड कळताच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ती तिथं अर्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून अत्य़ाधुनिक वैद्यकीय सुविधांनी एएलएस रुग्णवाहिका सज्ज झाली. या रुग्णवाहिकेतून अत्यवस्थ रुग्णालाही थेट मुंबईत आणता येईल. तेवढ्या वैद्यकीय सुविधा आहेत. या रुग्णवाहिकेचे आषाढी एकादशीला लोकार्पण करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ही पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे रुग्णवाहिका सोपवली जाईल.
डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनतर्फे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला एक अद्ययावत रुग्णवाहिका भेट देण्यात येणार आहे. रविवारी ठाणे येथून ही रुग्णवाहिका पंढरपूरकडे रवाना झाली.