डॉ. गिरीश जाखोटिया
नमस्कार मित्रांनो ! काही दिवसांपूर्वी नाशिकच्या एका भाजी मंडईत मी बायकोसोबत गेलो होतो. भाज्यांचा भला मोठा स्टॉल मांडलेल्या मावशींकडे आम्ही पोचलो. एकाच वेळी मावशी तीन ग्राहकांना वेगवेगळ्या भाज्या तोलून देत होत्या. तिघांपैकी दोघे उत्तर प्रदेशी ग्राहक असावेत. त्यांच्याशी हिंदीतही नेमका संवाद चालू होता. एखाद्या नव्या भाजीचे महत्त्वही त्या मध्येच सांगत होत्या. प्रत्येकाच्या पाच – सहा भाज्या आणि त्यांची अडनडी वजने. फटाफट तिघांचेही हिशोब तोंडी करून मावशींनी पैसे घेतले. मध्येच एक भाज्यांची घाऊक डिलिव्हरी करणारा टेम्पो आला होता. मावशींनी त्याला नेमक्या तोंडी सूचना देऊन अमुकतमुक भाज्या उतरवायला सांगितल्या. हे करताना मोबाईलवर एक छोटं संभाषणही पुरं केलं. आम्ही हे सारं काही दिंग्मूढ होऊन कौतुकाने पहात – ऐकत होतो. क्षणभर आम्ही आमचं कामही विसरलो ! कुठल्याही मॅनेजमेंट इंस्टिट्यूटला न जाता मावशींनी जे चौफेर उद्योजकीय कौशल्य दाखवलं होतं ते अचाट होतं. अशाच आमच्या सोलापूरच्या गौराक्का. कानडी हेल काढत मराठी बोलणाऱ्या. पंचवीस म्हशींचं व्यवस्थापन त्या आपल्या मुलीच्या मदतीने बघायच्या. पन्नास वर्षांपूर्वी त्या आपल्या या दुग्धव्यवसायाला व्यवस्थापनाची सर्व सूत्रे लागू करायच्या. त्यांची विशेषता अशी की त्या काळातील म्हणजे दुधाच्या बाजारातील खडानखडा माहिती त्या ठेवायच्या. मोबाईल, संगणक, डायरी – कशाचाच वापर नाही. सारा “डेटा” मेंदूत ठेवायच्या आणि तिथेच अपडेटही करायच्या. गमतीचा आणि कौतुकाचा भाग म्हणजे गौराक्काचा सल्ला घ्यायला परिसरातले बरेच “पुरुष गोपाल”ही यायचे.
देशी विद्वत्तेच्या महानायिकांमधील पहिली ज्ञात प्राचीन महानायिका होती “निऋती”. सिंधूजनांच्या प्रगत संस्कृतीचं सर्वाधिक मोठं वैशिष्ट्य होतं ‘शेती’. भारतीय उपखंडातील शेतीचा शोध लावला निऋती व तिच्या सहकाऱ्यांनी. मातृसत्ताक किंवा स्रीसत्ताक समाजव्यवस्थेची स्थापनकर्ती म्हणूनही निऋतीचा गौरव करायला हवा. तिच्या आठवणीसाठी एका दिशेला आम्ही ‘नैऋत्य’ म्हणतो. सृजणशीलतेचं महनीय प्रतिनिधित्व निऋती करते. सांख्य तत्वज्ञानातील ‘प्रकृती’ किंवा शाक्त तत्वज्ञानातील ‘शक्ती’ ही निऋतीचंच अध्यात्मिक नामकरण. नंतरच्या काळात आक्रमक व ओंगळवाण्या पुरुषप्रधान व्यवस्थेच्या प्रभावाखाली आम्ही निऋतीला विसरत गेलो. नाशिक मधील भाजीवाल्या मावशी आणि सोलापूरच्या गौराक्कामध्ये आजच्या निऋतीचं मला दर्शन होतं. बाराव्या शतकातील कर्नाटकातील ‘अक्कमहादेवी’ हे देशी विद्वत्तेच्या महानायिकेचं दुसरं वंदनीय उदाहरण. अक्कमहादेवीची स्रीस्वातंत्र्यावरील वचने खूपच मार्गदर्शक आहेत. अशा लेखनाच्या बाबतीतल्या त्या पहिल्या कन्नड कवयित्री. संत बसवण्णा व अल्लमप्रभूंनीही तिचा गौरव केला होता.
तिसरं अत्यंत महनीय आणि वंदनीय उदाहरण आहे राजमाता जिजाऊंचं. शिवरायांना स्वराज्य निर्मितीसाठीची प्रेरणा, मार्गदर्शन आणि आधार दिला तो माता जिजाऊंनी. व्युहात्मक रचना, सांस्कृतिक चेतना आणि सामाजिक संवेदना, ही तीन महत्त्वाची सूत्रे माता जिजाऊंनी शिवरायांना स्वराज्य उभारणीसाठी दिली होती. चौथं स्फूर्तीदायी उदाहरण आहे वंदनीय सावित्रीबाईंचं. ‘काव्यफुले’ आणि ‘बावणकशी सुबोध रत्नाकर’ या दोन उत्तम ग्रंथांच्या त्या लेखिका. जोतिबांसोबत स्रीमुक्तीचे आणि उद्धाराचे अनेक कठीण उपक्रम सावित्रीबाईंनी भीषण अडचणींचा सामना करीत चालविले. बालविवाह व सतीप्रथेला विरोध करीत त्यांनी विधवाविवाह आणि विधवांसाठी निवासाचे उपक्रम स्थायी स्वरूपात चालविले. अभिजन स्रियांनाही शिक्षणाचा हक्क सावित्रीबाईंनी मिळवून दिला. शैक्षणिक क्षेत्रातील ही एक मोठी क्रांती होती. सावित्रीबाईंची शिकविण्याची पद्धत ही तत्कालीन पद्धतीपेक्षा खूप चांगली होती.
” मन वढाय वढाय,
उभ्या पिकातलं ढोर,
किती हांकला हांकला,
फिरी येतं पिकांवर. ”
लेवा गणबोली मध्ये लिहिलेली ही बहिणाबाई चौधरींची कविता अख्या महाराष्ट्राला माहीत आहे. निरक्षर असलेल्या असोद्या (जळगाव) च्या बहिणाबाई या कृषिजीवन जगताना आपल्यासारख्या साक्षरांना मार्गदर्शन करतात. हे सारं किती विलक्षण आहे ! महानायिकांच्या स्फूर्तीदायी मालिकेतलं पाचवं उदाहरण हे बहिणाबाईंचं.
सहावं आणि हल्लीचं दैदीप्यमान उदाहरण म्हणजे “महाश्वेतादेवी” यांचं. या होत्या “योद्धा साहित्यिका” ! शंभरावर कादंबऱ्या लिहिणाऱ्या या ‘पंडिता’ सातत्याने आदिवासींसोबत राहिल्या नि त्यांच्यासाठी लढल्या. ज्ञानपीठ आणि पद्मविभूषण सारखे अनेक उत्तुंग पुरस्कार मिळालेल्या या महान विदुषीने ब्रिटिश राज्यकर्ते, प. बंगालचे सरकार, महाजन, मनीलेंडर्स, सरकारी अधिकारी इ. विरुद्ध अनेक रस्त्यावरील लढे गरीब स्रिया, दलित, शेतकरी आणि आदिवासींसाठी लढले. हजार चुरशिर मा, रुदाली आणि अरण्येर अधिकार या त्यांच्या काही अजरामर साहित्यिक कलाकृती. त्यांच्या नंदीग्रामच्या चळवळीत अनेक बुद्धिवंत, लेखक आणि कलाकार सामील झाले होते. देशी विद्वत्तेच्या या सहाही महानायिकांमध्ये एक समान सूत्र आहे “प्रज्ञे”चं. प्रज्ञा म्हणजे समाजकल्याणासाठी उपयोगात येणारी बौद्धिक ऊर्जा. या सर्व महानायिकांनी जनसामान्यांच्या उद्धारासाठी आपली प्रज्ञा वापरली. यांच्या विद्वत्तेला जगण्याच्या वास्तवाचा आधार होता. दिखाऊ विद्वत्तेतील भंपकपणा, अंधश्रद्धा आणि अहंकाराला इथे अजिबात वाव नव्हता.
भारतीय खेडी आणि तालुक्यांमध्ये देशी विद्वत्तेला पुढे नेणाऱ्या असंख्य भगिनी आहेत. त्यांना गरज आहे कौटुंबिक आणि सामाजिक प्रोत्साहनाची, संस्थात्मक आधाराची आणि वित्तीय मदतीची. मात्र गार्गीला पुरुषी अहंकाराने गप्प बसविणाऱ्या याज्ञवल्क्याची मानसिकता आजही बऱ्याच भारतीय पुरुषांमध्ये अस्तित्वात आहे. बऱ्याच संस्था, संघटना आणि समाजांमध्ये २१व्या शतकातसुद्धा बौद्धिकदृष्ट्या स्रियांना कमी लेखले जाते. आजही स्वतःला विद्वान समजणाऱ्या आणि म्हणून तर्हेवाईकपणाने वागणाऱ्या अनेक पुरुषांचे संसार त्यांच्या चतुर व विवेकी बायका सांभाळतात. फुकाचा पुरुषी माज आजही बऱ्यापैकी बऱ्याच उत्तर भारतीय भागांमध्ये टिकून आहे. दुर्दैवी बाब अशी की अनेक भारतीय कुटुंबांमध्ये विद्वत्तेचा ध्यास असणाऱ्या स्रियांना अन्य महिलाच आजही मागे खेचत असतात. उत्तर भारतीय तुलनेत स्रियांच्या उपजत बुध्यांकाचा दुःस्वास हा पूर्व, पश्चिम – दक्षिण आणि दक्षिण भारतात खूप कमी केला जातो. अर्थात असा दुःस्वास इथे कमी असण्यास स्रीसत्ताक अथवा मातृसत्ताक संस्कृतीची पार्श्वभूमी कारणीभूत आहे. माझे एक महत्त्वाचे निरीक्षण व तार्किक विश्लेषण असे आहे की जिथे जिथे निऋतीचा ठसा उमटला नि टिकला, तिथे तिथे देशी विद्वत्तेच्या भारतीय महानायिका आपला बौद्धिक पराक्रम दाखवत राहिल्या !
(डॉ. गिरीश जाखोटिया हे उद्योजकीय, वित्तीय व व्यवस्थापन सल्लागार आहेत. तसेच ते ज्येष्ठ लेखक, विचारवंत असून समकालिन घटनांवर ते अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक भाष्य करतात. सध्या मुख्य सल्लागार, जाखोटिया आणि असोसिएट्स, मुंबई – ५७ म्हणून कार्यरत आहेत.)
(महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या “श्रमकल्याण युग” या मासिकात हा लेख नुकताच प्रकाशित झालाय)
Copyright © jakhotiya.com
Right to change/reproduce withheld, IPC copyright Act 1957. The article can be forwarded with author’s name for public awareness.
वरील लेख भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार फेरफार अथवा नक्कल निषेधित. लेखकाच्या नावानिशी हा लेख विविध समूहांमध्ये पाठविता येईल.
संपर्क: girishjakhotiya@gmail.com