डॉ. गणेश गोळेकर
प्रा.डॉ. तानाजी सावंत यांची रविवारी धाराशिव येथे “हिंदूगर्व गर्जना” या कार्यक्रमात बोलताना पातळी घसरली. बोलता बोलता आपण कोणाला बोलतोय यांचे भानच त्यांनी बाळगले नाही. संपूर्ण मराठा समाजाला क्षणार्धात त्यांनी आरोपिच्या पिंजऱ्यात उभे केले. गेल्या दोन वर्षांत एकही मोर्चा निघाला नाही. एकही नेता आरक्षणा बद्दल बोलला नाही. एकनाथभाई आणि फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर आरक्षणाची खाज सुटली. कोणी ओबीसीतून आरक्षण आरक्षण मागतोय. उद्या कोणी एस्सीतून आरक्षण मागेल. कोणी एसटीतून आरक्षण मागेल. एका ब्राह्मणाने मराठा समाजाची झोळी भरली, असा आक्रस्ताळेपणा त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता. कळंब ला मोर्चा निघाला. उद्या संभाजीनगर ला निघेल.परवा आणखी कुठे निघेल. याचा बोलविता धनी कोण आहे? अशी प्रश्नार्थक दर्पोक्ती त्यांनी केली.
तानाजी सावंत तसे मराठाच. मात्र राजकीय बाजू सांभाळताना त्यांच्यातील दमछाक समोर आली. बोलता बोलता आपण मराठा समाजाबद्दल काय गरळ ओकतोय याच भानही त्यांनी बाळगले नाही. गेल्या दोन वर्षांत एकही आंदोलन झाले नाही हा त्यांचा आक्षेप. बहुतेक सावंत साहेबांना कोरोनाची परिस्थिती माहित नसावी. सावंत साहेब आपण मराठा आंदोलन बलिदान दिलेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केलीत, तेंव्हा आम्ही आपणास डोक्यावर घेतले. नव्हे ते आमचे कर्तव्यच होते. मात्र ना.प्रा.डॉ.तानाजी सावंत सत्तेची नशा डोक्यात जावू देवू नका. आपण मोठे होण्यामध्ये मराठा समाजाचा सिंहांचा वाटा आहे. जाहीर सभेमध्ये समाजाला काय दुषणं देतात,याचा जरुर विचार करा. 50% च्या आतील ओबीसीतून घटनात्मक आरक्षण ही मागणी जूनीच आहे. आपण मंत्री नव्याने झालात. आपला तोल ढळतं जावून एस्सी, एस्टी तून आरक्षण मागतोय असा आविर्भाव आपल्या बोलण्यातून जाणवत होता. या आंदोलना मागचा बोलवता धनी कोण हे विचारण्याचे धारिष्ट्य आलेच कोठून? आपल्या बोलण्यातून कळंब येथील मोर्चा, भविष्यात निघणारे मोर्चे याविषयी तिडीक दिसून आली. आम्ही घरची चटणी-भाकरी खाऊन समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी माणसं. आम्हाला वाटतं होतं आपल्या सारखी नेतेमंडळी आमच्या समाज कार्यासाठी कौतुकाची थाप देतील. वडेट्टीवार, पटोले, भुजबळ, बावनकुळे हे जसे ओबीसी आंदोलनास पाठबळ देतात, त्यांच्या सारखं पाठबळ देताल. मात्र आपण तर आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. आमचा बोलवता धनी कोण असा जाब विचारला आहे. ओबीसी तून मागितलेल्या आरक्षणावर शंका घेतली आहे. गेल्या दोन आंदोलन का केले नाहीत, असा जाहीर जाब विचारला आहे.
सत्तेत कोण आहेत यापेक्षा मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आम्ही वेळोवेळी जाब विचारला व विचारणार आहोत. युती असो कि आघाडी, आम्ही सातत्याने शासन दरबारी समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे व उठवत राहणार. राहिला प्रश्न बोलवता धनी कोण तर मराठा समाजातील ७५% गोरगरीब, अल्पभूधारक, सालगडी, ऊसतोड कामगार, माथाडी कामगार, डब्बेवाला, हमाल, भरडला जाणारा शोषित मराठा समाज आहे. साहेब आपण समाजाला न्याय देणे अभिप्रेत आहे. आपण काय ते टिकावू मराठा आरक्षण बोललात. मग आम्ही सुद्धा तेच मागतोय. गफलत करू नका, नाही तर आपणास पचनी पडणार नाही. आपण राज्याचे जबाबदार कॅबिनेट मंत्री आहात. साष्टे-पिंपळगांव सह अनेक छोटे-मोठे आंदोलने राज्यभरातून करण्यात आली. भलेही त्यांचे स्वरूप लहान असेल. आपण राज्याच्या विविध पोलीस स्टेशन मधून आंदोलनाची माहिती मागवून घ्या, म्हणजे सामान्य मराठा समाजाने आंदोलन केले किंवा नाही याची माहिती जाणून घेता येईल.यात बडी धेंडे नामानिराळी राहिली, हा भाग वेगळा. या मुद्यावर ज्यांना राजकारण करायचे त्यांनी ते खुशाल करावे, मात्र भरडला जातोय तो सामान्य मराठा समाज. बरं सावंत साहेब २०२४ पर्यंत टिकावू मराठा आरक्षण मिळेल असा जावईशोध आपण कसा लावला? आपल्या भाषणात आपण २०२४ हे वर्षं जाहिरच करुन टाकले आहे. २०१८ ला आरक्षण दिले त्यावेळी आपणही सत्तेत होतात. रद्द झाले तेंव्हाही सत्तेत होतात.
तानाजी सावंत यांनी मराठा समाजावर केलेल्या बेताल वक्तव्यावर माफी मागितली खरी मात्र ती मागताना पुन्हा मनाचा कोतेपणा दाखवला. आरक्षण रद्द झाल्यापासून ते हे नविन सरकार स्थापन होईपर्यंत एकाही नेत्याने आवाज उठवला नाही असे सांगितले. शिवाय विकृती जागृत झाली असा शब्दप्रयोग पुन्हा केला. सावंत साहेब आपल्या निदर्शनास आणून द्यायचे आहे की, जेव्हा आरक्षण रद्द झाले त्यातील प्रमुख कारण ५०% च्या वरील आरक्षण दिले हे होते. आमच्या सारखे शेकडो,हजारों तरुण-तरुणी यांनी यावर आवाज कायम उठवला आहे. ५०% च्या आतील ओबीसी आरक्षण ही नांदी वेळोवेळी लावून धरली आहे. मात्र आम्ही गोरगरीब, सर्वसामान्य मराठा समाजाची मुले असल्याने आमचा आवाज आपल्या पर्यंत पोहोचला नाही. साहेब ज्याची जळते त्यालाच कळते, याच न्यायाने आरक्षण रद्द झाल्याची झळं आम्ही अनुभवली आहे. आणि आपण नवीन सरकार स्थापन झाले तेंव्हा विकृती जागृत झाली असे म्हटल्यास. सामान्य मराठा समाजाच्या आरक्षणाचा आवाज जर विकृती वाटत असेल तर ते आमचे दुर्दैव. आपलेही समाजासाठी मोठे योगदान आहे. मागच्या सरकारमध्ये आपणास मंत्री केले नव्हते. समाजाचा बुलंद आवाज म्हणून आपणास मंत्रीमंडळात समाविष्ट करावे म्हणून अनेक समाज बांधवांनी निवेदने दिली, अनेकांनी तर आंदोलने केली. आपण मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्या बांधवांच्या कुटूंबियांना दिलेली प्रत्येकी एक लाख रु.ची मदत समाज विसरलेला नाही. या सरकारने कळंब मराठा मोर्चा च्या दुसऱ्या दिवशी मराठा समाजाच्या प्रश्नांवर मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली. त्यात आपणा सारख्या मंत्र्याचा समावेश असावा अशी मागणी अनेक समाज बांधवांनी लावून धरली होती. मग समाजाच्या आरक्षणाच्या घटनात्मक मागणीला आपण आक्षेप का घ्यावा, असा प्रश्न आमच्या सारख्या सर्वसामान्य बांधवांना पडतो. टिकणारे आरक्षण मिळावे ही आपली प्रामाणिक इच्छा. मग घटनात्मक मार्गाने मिळणाऱ्या ५०% च्या आतील ओबीसी यादीतील आरक्षणावर आपण आक्षेप घेण्याचे कारण काय? यात राजकारणाचा लवलेशही नाही. सरकार युतीचे असो किंवा आघाडीचे, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, ही प्रामाणिक इच्छा. बाकी आपणास काही वेगळे दिसत असेल तर तो समाजाचा दोष नाही. मात्र समाजाबद्दल बोलताना संयम बाळगावा,ही माफक अपेक्षा.
डॉ. गणेश गोळेकर
(डॉ. गणेश नानासाहेब गोळेकर यांचा शिक्षण, इतिहास, आरक्षण, मराठवाडा आणि शेतीप्रश्नांचा चांगला अभ्यास आहे. ते मराठा-सेवक म्हणून कायम स्वत:ला संबोधतात.)