मुक्तपीठ टीम
केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे २३ वे राष्ट्रीय महाअधिवेशन नुकतेच पार पडले. काँग्रेस नेत्याने केलेल्या कम्युनिस्ट नेत्याच्या प्रशंसेमुळे चर्चेत आलेल्या या अधिवेशनात महाराष्ट्रासाठीही एक चांगला निर्णय झाला आहे. माकपच्या पॉलिटब्यूरो या सर्वोच्च समितीवर १७ सदस्यांची निवड करण्यात आली. त्यात अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळेंचा समावेश आहे. तर अन्य तीन मराठी नेत्यांचीही केंद्रीय समितीवर निवड झाली आहे.
महाराष्ट्रातून केंद्रीय समितीवर ३ सदस्य
- डॉ. अशोक ढवळेंची पॉलिट ब्युरोवर निवड झाली आहे.
- ३ सदस्यांची ८५ सदस्यांच्या नवीन केंद्रीय कमिटीवर निवड करण्यात आली आहे.
- पक्षाच्या या महाअधिवेशनात किसान सभेचे माजी राज्य अध्यक्ष व यापूर्वी ७ वेळेस निवडून आलेले आमदार जे. पी. गावित, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, पक्षाचे नवीन महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांची निवड केली आहे.
पॉलिट ब्युरोवर निवड होणारे तिसरे मराठी नेते!
- पक्षातील सर्वोच्च अशा पॉलिटब्युरोवर निवड होणारे राज्यातील डॉ. ढवळे हे तिसरे नेते आहेत.
- यापूर्वी राज्यातील बी. टी. रणदिवे व एम. के. पंधे यांनी पॉलिटब्युरोचे सदस्य म्हणून काम केले होते.
- माजी आमदार नरसय्या आडाम यांनी वयाच्या ७५ वर्षे या अटीमुळे राज्य सचिवपदावरून निवृत्ती स्वीकारली.
- त्यांच्या जागी राज्य सचिवपदी डॉ. उदय नारकर यांची नियुक्ती करण्यात आली.
- पक्षाच्या नवीन केंद्रीय समितीवर माजी आमदार जीवा पांडू गावीत आणि मरियम ढवळे यांची नियुक्ती करण्यात आली.
लाँग मार्चवरील पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन
- पक्षाच्या अधिवेशनात २०१८ मध्ये निघालेल्या नाशिक ते मुंबई या सुमारे ४० हजार शेतकरी व आदिवासी बांधवांच्या ऐतिहासिक लॉंग मार्चवर आधारित ‘फार्मर्स ऑन द मूव्ह’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
- राज्यातील या आंदोलनाची अधिवेशनात दखल घेण्यात आल्याचे राज्य किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी सांगितले.
- महाराष्ट्राच्या धर्तीवर देशात अन्यत्रही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करावा, असा ठराव करण्यात आल्याची माहितीही डॉ. नवले यांनी दिली.