मुक्तपीठ टीम
होमिओपॅथीच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल यंदाचा ‘नेल्सन मंडेला शांतता पुरस्कार’ पुण्यातील होमियोपॅथी तज्ज्ञ डॉ. अमरसिंह निकम यांना प्रदान करण्यात आला. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या पुरस्कार सोहळ्यात नेल्सन मंडेला पीस युनिव्हर्सिटीतर्फे डॉ. निकम यांना मानद डॉक्टरेट देऊनही सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात डॉ. निकम यांनी केलेल्या देशसेवेचा सन्मान झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या सोहळ्यासाठी इस्रायलचे कॉन्सुलेट जनरल कोबी सोशानी, मदर तेरेसा विद्यापीठाच्या संस्थापक व कुलगुरू डॉ. विजया सरस्वती, नेल्सन मंडेला नोबेल पीस युनिव्हर्सिटीचे कुलपती आर्च बिशप जॉन्सन, संगीतकार अनु मलिक, गायक आदित्य नारायण, डॉ. निकम यांच्या कुटुंबातील डॉ. सुचित्रा, डॉ. मनीष, डॉ. मनस्विनी आदी उपस्थित होते.
होमिओपॅथीच्या माध्यमातून डॉ. निकम यांनी आजवर हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. देशातील पहिले १०० बेडचे होमिओपॅथी हॉस्पिटल असलेल्या आदित्य होमिओपॅथी हॉस्पिटलच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरीब जनतेची वैद्यकीय सेवा माफक दरामध्ये त्यांनी केली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या जागतिक महामारीविरुद्ध लढा देताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशसेवेसाठी काम करत असलेल्या आरोग्यदूत, पोलीस यंत्रणा, स्वच्छता कर्मचारी अशा हजारो कर्मचाऱ्यांना मिशन होमिओपॅथी पुणेच्या माध्यमातून देशभरात मोफत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी औषधे पुरवण्यात आली.
काही दिवसांपूर्वीच डॉ. निकम यांच्या होमिओपॅथी क्षेत्रातील औषधांवरील पुस्तकाचे ज्येष्ठ सरकारी वकील ऍड. उज्वल निकम यांच्या हस्ते प्रकाशन झाले होते. आजवर त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून, ती नव्याने होमिओपॅथीची सेवा देणाऱ्या डॉक्टरांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांच्या अविरत कार्यामुळेच देशाच्या कानाकोपऱ्यात शास्त्रशुद्ध होमिओपॅथी उपचार पोहोचले आहेत. रुग्णसेवा हीच देशसेवा आहे, अशी त्यांची धारणा आहे. या पुरस्काराबद्दल डॉ. निकम यांनी आनंद व्यक्त केला. यापुढेही ही वैद्यकीय सेवा अशीच सुरु राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.