मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढतच जात आहे. दिवसेंदिवस नव्या रुग्णांची आणि मृत्यू झालेल्यांच्या संख्येत वाढ नोंदवली जात आहे. त्याचवेळी अनेकांकडून आजही कोरोना झाल्याचे लपवले जात असल्याने त्यांच्या उपचारात हयगय होऊन त्यांना धोका होतच आहे, पण त्याचवेळी त्यांच्या आजाराची खरी कल्पना नसल्याने त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांच्या जीवावर बेतण्याची भीती आहे. सांगलीत एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनाने मृत्यू ओढवला आहे. ते तिघेही नातेवाईक कोरोनाने आजारी असल्याने भेटून आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
कोरोनाची लागण झालेल्या नातेवाईकाला भेटायला गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूची ही घटना सांगलीतील मिरज तालुक्यातील टाळळी येथे घडली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये एकाच कुटुंबातील बाहुबली पाटील, त्यांची आई आणि चुलता अशा तिघांचा समावेश आहे.
नेमकं काय घडले?
• या कुटुंबाच्या नातेवाईकाची तब्येत बिघडली होती.
• त्या नातेवाईकाला कोरोनाची लागण झाली होती, हे कळताच घरातील सर्व नातेवाईकाच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी त्याच्या घरी गेले होते.
• त्या नातेवाईकाला कोरोनाची लागण झाली होती, ही माहिती घरातील मुख्य व्यक्तीने आपल्या आईपासून लपवली होती.
• त्यानंतर त्यांच्या आईला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.
• त्यानंतर एका पाठोपाठ ती मुख्य व्यक्ती, त्यांच्या पत्नी तसेच दोन चुलत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
• या सर्वांना सौम्य लक्षणे दिसत असल्याने संपूर्ण कुटुंबाने घरीच उपचार करण्यास सुरुवात केली.
• या दरम्यान, त्यांच्या आईंची तब्येत खालवली त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
• त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या चुलत्याचे निधन झाले.
• हे दोन धक्के बसल्यानंतर त्या घरातील मुख्य व्यक्तीचेही कोरोनाने निधन झाले.
कोरोनाला गंभीरतेने घ्या!
• कोरोनाला गंभीरतेने न घेणे आणि योग्य उपचार न घेता घरीच उपचारावर भागवणे, हे त्या कुटुंबाला फारच महागात पडले आहे.
• असं कुणासोबतही घडू शकते. त्यामुळेच कोरोनाला गंभीरतने घ्या, असे आवाहन डॉक्टर सातत्याने बजावत असतात.
• व्हॉट्सअपवर येणाऱ्या व्हायरल पोस्ट या अनेकदा खोटी, चुकीची माहिती पसरवतात, त्यांच्यावर, सभोतालच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका.
• कोरोनाची लक्षणे आढळली तर थेट डॉक्टरांचाच सल्ला घ्या.
• डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचारांची दिशा ठरवा, नाहीतर अज्ञान आणि दुर्लक्षाची किंमत तुम्हाला आणि इतरांनाही मोजावी लागते.