दिलीप डाळीमकर / व्हा अभिव्यक्त!
जुगार खेळात आपले आयुष्य हरणाऱ्या मित्राबाबत खालील लेख लिहीत असतांना डोळ्यात अश्रू आणि हातात पेन अशी अवस्था आज माझी झाली आहे.
कामानिमित्त एक दिवस डॉक्टराकडे गेलो होतो. डॉक्टराशी गप्पा करता करता सहज विषय निघाला.मी डॉक्टरांना म्हटलं “डॉक्टर साहेब,तुम्ही माझा मित्र आतिष (नाव बदललेले) यांच्या घराजवळ रहात होता तेंव्हापासून मी तुम्हाला ओळखतो.”
तेंव्हा डॉक्टर साहेबांनी सांगितले की “आतिष ने जीवन संपवले हे तुम्हाला माहीत नाही का?” कसं माहीत असणार! कॉलेजचे शिक्षण संपल्यावर नोकरी व्यवसाय निमित्ताने गेले वीस वर्षे बाहेर गावी असल्याने त्या ठिकाणही संपर्क फारसा नव्हता. डॉक्टरांनी त्या मित्राच्या आयुष्यातील चढउतार बाबत सांगितले.
मित्र आतिष व मी दहावीपर्यंत एकाच वर्गात होतो.शालेय जीवनात आतिष हा अभ्यासू विद्यार्थी होता.त्याचे आई वडील शिक्षक तर मोठा भाऊ सुद्धा डीएड करून नोकरीला लागला होता. आतिष ने सुद्धा डीएड शिक्षण घेतले व नोकरीला लागला. सुरवातीला सर्वसामान्य शिक्षकप्रमाणे आतिष नोकरी करत होता. घर ते शाळा असाच त्याचा दिनक्रम.
गंमत मौजमजा म्हणून तो मित्रांसोबत पत्ते खेळू लागला. नंतर मात्र तो पक्का जुगारी झाला. शाळेतील नोकरीवर लक्ष कमी व जुगारावर जास्त. दिवसरात्र त्याच्या डोक्यात जुगाराचा विषय असायचा. जुगारात तो प्रचंड कर्जबाजारी झाला. सर्व पगार कर्जाचे व्याज व जुगारात खर्च व्हायचा. कर्जबाजारीपणामुळे त्याला गांजा दारूचे व्यसन लागले.
आतिषच्या डोक्यावर झालेल्या कर्जविषयी तो आई वडील व भावाशी मनमोकळ्यापणाने बोलत नव्हता. तो अबोल झाला होता. स्वतःच्या दुनियेत हरवल्या सारखा आले ते दिवस पुढे ढकलत होता. हे सगळ चालू असताना एक दिवस आतिष ने आत्महत्या केली. आपली जीवन यात्रा संपविली. शालेय जीवनात अतिशय हुशार असलेल्या मित्राबाबत ही घटना ऐकल्यानंतर मन दुःखी झाले व अश्रूपूर्ण नयनांनी त्या डॉक्टराच्या हॉस्पिटलमधून घरी आलो. ही घटना बरेच दिवस मनात घर करून आहे.
प्राचीन काळापासून जुगार हे एक माणसाचे व्यसन मानले गेले आहे. द्युतामध्ये आपले राज्य आणि द्रौपदीला पणाला लावणाऱ्या पांडवांपासून क्रिकेटसारख्या खेळांवर पैसे लावणाऱ्या सट्टेबाजांपर्यंत असंख्य प्रकारचा जुगार युगानुयुगे खेळला जात आहे. वरली मटका च्या धंदा दिवसेंदिवस वाढत आहेत. दुर्दैवाने या जुगाराच्या धंद्याला राजकीय आश्रय मिळत असल्याचे बऱ्याचवेळ दिसून येते.
आधुनिक जगात जुगाराला राजमान्यता देऊन असंख्य कॅसिनोसारखी ‘द्युतगृहे’ चालवली जात आहेत.संगणकामुळे वेबसाईटद्वारे जुगार चालवणारी अगणित संकेतस्थळे जगभरात जोमाने फोफावली आहेत.
आजचा तरुणवर्ग सुद्धा जुगाराच्या नादाला लागला आहे. गावखेडी छोटी मोठी शहरात जुगार मटका जोमाने चालू आहे.जुगार खेळाला वयाचे बंधन नसते. तरुण म्हातारे या जुगाराच्या आहारी गेले आहेत. अनेकांनी पैसे अडका संपत्ती जुगारापायी गमावली आहे.
पूर्ण शुद्धीत असताना, हेतुपुरस्सर जुगार खेळल्याने पुढे काय होईल याबद्दल तर्क माहीत असूनही पैसे किंवा एखादी मौल्यवान गोष्ट पणाला लावून ती जास्त प्रमाणात परत मिळेल अशी ईर्ष्या जुगारी माणसे बाळगत असतात.
आजच्या परिस्थितीत जुगार हा मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झाला. जुगारापायी व्यसनाधीनता कौटुंबिक कलह इत्यादी गंभीर समस्या निर्माण होत आहे. आजच्या पिढीने पैश्याचा मोहापायी जुगारात आयुष्य हरवू नये यासाठी समाजप्रबोधन होणे गरजेचे आहे.
(शेतकरी पुत्र ; लेखक- सामाजिक राजकीय विषयावर लेखन
ग्रामीण जीवनावर आधारित कविता लेखन)