मुक्तपीठ टीम
रशिया आणि युक्रेनच्या युद्धादरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खळबळजनक विधान केलेले आहे. शनिवारी रिपब्लिकन राष्ट्रीय समितीच्या प्रमुख देणगीदारांना संबोधित करताना त्यांनी हे युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेने काय केले पाहिजे हे सांगितले. ट्रम्प यांनी आपल्या भाषणात म्हटले की, ‘अमेरिकेने आपल्या एफ-२२ लढाऊ विमानांवर चिनी झेंडे लावून रशियावर हल्ला करावा. यानंतर चीनने हे केले आहे, असे म्हणूया. मग चीन आणि रशिया एकमेकांशी भांडू लागतील आणि आपण बसून तमाशा बघू.
ट्रम्प यांनी सुचवलेल्या मार्गावर उपस्थित लोकांनी हा विनोद म्हणून घेत हसून टाळ्या वाजवल्या. अमेरिकन मीडियाच्या रिपोर्ट्समध्ये ही माहिती समोर आली आहे. तसेच ट्रम्प यांनी युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यात थेट हस्तक्षेप न केल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावर टीका केली.
नाटो कागदावरचा सिंह…
- यासोबतच ट्रम्प यांनी NATO (North Atlantic Treaty Organisation) ला कागदावरचा सिंह म्हटले आहे.
- त्यांनी म्हटलं, अखेर कोणत्या मुद्द्यावर देश म्हणतील की आम्ही मानवतेच्या विरोधातील एवढा गंभीर गुन्हा होवू देणार नाही. आम्ही असं होवू देवू शकत नाही. तसं सुरु राहू देवू शकत नाही.
- रशिया हा अणुशक्ती असलेला देश असल्याने आम्ही हल्ला करणार नाही, असे म्हणणे आता बायडन यांनी थांबवावे, असे ट्रम्प म्हणाले.
आधी पुतिन यांचे कौतुक, मग टीकेची झोड!
- जेव्हा पहिल्यांदा रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता तेव्हा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कौतुक केले.
- यासाठी त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी त्यांचा निषेध केला होता.
- आता त्यांनी आपली भूमिका बदलली असून राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्यावर निशाणा साधला आहे.
- यावेळी मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो तर पुतिन यांनी जे केले ते त्यांनी कधीच केले नसते, असा दावाही ट्रम्प यांनी केला आहे.