मुक्तपीठ टीम
दिवाळीचे उत्सव रंग देवस्थानांमध्येही झळकतात. साईबाबांच्या शिर्डीत प्रकाशोत्सवाची झगमग असतेच पण पारंपरिक पद्धतीनं सण साजरा करण्यात येतो.
श्री साईबाबा संस्थानाच्यावतीने सालाबादप्रमाणे याहीवर्षी रुढी परंपरेनुसार दिपावली श्रीलक्ष्मीपूजन उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या वर्षी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दिपावली श्रीलक्ष्मीपूजन उत्सव कोरोना नियमांचे पालन करुन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
या दिपावली उत्सवानिमित्त शनि शिंगनापुर येथील गणेश शेटे, शनेश्वर डेकोरेटर्स यांच्यावतीने देणगीस्वरुपात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. शिर्डी येथील साईभक्त विजय तुळशीराम कोते यांच्या देणगीतून समाधी मंदिर, द्वारकामाई, चावडी व गुरूस्थान या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार आहे. तसेच रतलाम येथील साईभक्त अनिल सिसोदिया हे मंदिर परिसरात व प्रवेशव्दारावर आकर्षक रांगोळ्या काढणार आहे.
दिपावलीनिमित्त दिनांक ०४ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ०५.०० ते ०६.०० यावेळेत समाधी मंदिराच्या गाभाऱ्यात लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम होणार असून यावेळी श्रीगणेश पूजन, लक्ष्मी-कूबेर पूजन, सरस्वती पूजन व श्रींना धूप-नैवेद्य दाखविणे आदी कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे सायंकाळी ०५.०० वाजता दर्शनरांग बंद करण्यात येईल. लक्ष्मी-कूबेर पूजन झाल्यानंतर सायंकाळी ०६.१५ वाजता श्रींची धुपारती होवुन सायं.६.४५ वाजता साईभक्तांसाठी दर्शनरांग सुरु करण्यात येईल. तर रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होणार आहे.
दिपावली श्रीलक्ष्मीपूजन उत्सवाचे सर्व कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करुन करण्यात येणार असल्याचे सांगुन सर्व साईभक्तांना, शिर्डी ग्रामस्थांना व संस्थान कर्मचाऱ्यांना दिपावलीच्या शुभेच्छा ही श्रीमती बानायात यांनी दिल्या.
तुळजापूरच्या मुदगलेश्वरमध्ये दीपोत्सव साजरा
महाराष्ट्रातल्या इतरही काही मंदिरात दीपोत्सव साजरा केला जातो. तुळजापूर शहराच्या पायथ्याशी असणाऱ्या मुदगलेश्वर येथे दिपावलीच्या पुर्व संध्येला दिपोत्सव साजरा करण्यात आला आहे. वर्ष भरातील प्रत्येक उत्सव हा श्री मुदगलेश्वर महादेव सेवा समितीच्या माध्यमातून साजरा करण्यात येतो.
कोरोनामुळे २ वर्षांपासून दिपावलीच्या पूर्व संध्येला साजरा करण्यात येत असलेला दीपोत्सव खंडीत झाला होता. मात्र यंदा श्री मुदगलेश्वर महादेव सेवा समितीने हा दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. तुळजापुर शहरातील तसेच परिसरातील भक्त मोठया भक्तीभावाने या दिपोत्सव महोत्सवात सहभागी झाले होते.
पाहा व्हिडीओ :