मुक्तपीठ टीम
सनई चौघड्याचा नाद, बँडचा ताल, वाजत-गाजत निघालेली वरात, घोड्यावर दिमाखात बसलेले नवरदेव, लाजत मुरडत बोहल्यावर चढणारी नवरी, नटलेली वऱ्हाडी मंडळी, मांडलेला रुखवत, मंगलाष्टकांची सुरावट, डोईवर पडलेल्या मंगल अक्षता अन जोडीदाराशी नजरानजर करताना ओसंडून वाहणारा चेहऱ्यावरचा आनंद अशा या अनोख्या दिव्यांगांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे नेत्रदीपक क्षण पुणेकरांनी शुक्रवारी अनुभवले.
सक्षम पुणे महानगर, दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व वैद्यकीय संशोधन केंद्र, वानवडी, श्री अग्रसेन भगवान चॅरिटेबल फाऊंडेशन, रतनलाल हुकुमचंद गोयल यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांचा सामुदायिक विवाह सोहळा थाटामाटात बिबवेवाडी येथील गोयल गार्डन मंगल कार्यालयात पार पडला. सक्षम पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष ॲड. मुरलीधर कचरे, पुणे महानगर अध्यक्ष डॉ. संजीव डोळे, सचिव दत्तात्रय लखे, प्रांत सचिव महेश टांकसाळे, सहसचिव गहिनीनाथ नलावडे, शिवाजी भेगडे, सुहास मदनाल, विजय पगडे आदी उपस्थित होते.
दारातील तुळशी वृंदावनापासून ते देवघर, स्वयंपाक घरातील सर्व भांडी, बाथरूममधील साहित्य, सोफा-बेड अशा बारीकसारीक प्रत्येक गरजेच्या वस्तू रुखवतात मांडण्यात आल्या होत्या. १२ जोडप्यांचे यावेळी संपूर्ण थाटामाटात लग्न करून देण्यात आले. संपूर्ण विवाह सोहळ्याचा खर्च उद्योजक रतनलाल गोयल यांनी केला.
ऍड. मुरलीधर कचरे म्हणाले, “दिव्यांगांच्या आयुष्यात आनंद पेरण्यासाठी तीन-चार वर्षांपासून हा उपक्रम घेतला जात आहे. त्यांना परिपूर्ण करण्याचा हा प्रयत्न आहे. यंदा १२ जोडपी विवाहबंधनात अडकली. गोयल गार्डनचे मालक रतनलाल गोयल यांनी पुढाकार घेत सक्षम पुणे महानगरच्या मदतीने हा सोहळा केला आहे.” रतनलाल गोयल व डॉ. संजीव डोळे यांनीही आपल्या भावना व्यक्त करत नवदाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या.
सामुदायिक विवाह सोहळ्याचे समन्वयक दत्तात्रय लखे म्हणाले, “मार्च महिन्यात दिव्यांगांचा परिचय मेळावा घेतला. यावेळी खास समुपदेशन करण्यात आले. उपवरांच्या घरी भेटी देऊन विवाह निश्चित केले. आज प्रत्यक्ष सामान्य जोडप्या प्रमाणे थाटात यांचा संपूर्ण कन्यादान सह विवाह संपन्न झाला. सर्व संसारोपयोगी साहित्य दिले आहे. यासाठी सर्व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.”
दिव्यांग नवरी स्वाती भोज म्हणाली, “हा माझ्या आयुष्यातील खूप महत्वाचा क्षण आहे. नवी वाटचाल सुरू होते आहे. घरच्यांचा आणि सक्षम संस्थेचा फार आधार मिळाला. भविष्याची नवीन वाटचाल आनंदात सुरू होत आहे.”
बुलढाण्याचा नवरदेव सतीश थावराणी म्हणाला, “हा आनंदाचा क्षण अनुभवण्याची संधी दिल्याबद्दल ‘सक्षम’चे खूप आभार मानतो. सर्वसामान्य जोडप्यांसारखे आमचेही लग्न थाटात झाले याचे समाधान वाटते. मी सीए असून, स्वाती बीकॉम करत आहे. आम्ही दोघे सुखाचा संसार करू.”