मुक्तपीठ टीम
राज्य सरकारच्या संकेतस्थळावर जिल्हानिहाय कोविड संदर्भातली माहिती ही अपूरी असून सर्वसामान्य जनतेला आजच्या घडीला जी माहिती गरजेची आहे ती माहिती देण्यात पारदर्शकता का नाही, असा सवाल भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव दिव्या ढोले यांनी राज्य सरकारला केला आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
राज्य सरकारचा कारभार किती गलथान पध्दतीने चालतो ते पुन्हा एकदा सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरून दिसून आले आहे. आजमितीला राज्यात जिल्हानिहाय कोरोनाचे किती रूग्ण आहेत, किती रूग्णालयात किती खाटां उपलब्ध आहेत, मृतांची संख्या काय आहे अशी अधिकृत माहिती परिपूर्ण स्वरूपात सरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध नाही आहे. या संकेतस्थळावर ३६ जिल्हापैकी पाच जिल्ह्यांचे संकेतस्थळे सुरूच नाहीत. यामध्ये मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, सातारा आणि जळगाव जिल्ह्यांचा समावेश आहे. आज एक-दीड वर्ष झाले अजुनही ही संकेतस्थळे सुरू केलेली नाहीयेत मग राज्य सरकारला या जिल्ह्यातली माहिती कोणत्या पद्धतीने मिळते? या पाच जिल्ह्यातली संकेतस्थळे सुरू करण्यासंबंधित सरकारकडून का पाठपूरावा केला जात नाही, असा सवाल दिव्या ढोले यांनी सरकारला केला आहे.
त्या म्हणाल्या की, केवळ २० जिल्ह्यातल्या कोरोना डॅशबोर्ड वर अद्दयावत माहिती उपलब्ध आहे. मात्र, या सर्व जिल्ह्तली माहिती गोळा करून ती सादर करण्यामध्ये एक समान अशी पद्धत ठेवलेली नाहीये. त्यामुळे बऱ्याचशा जिल्ह्यांची अपूरी माहिती आढळून येते. त्यासाठी महसूल विभागाकडून आवश्यक असलेल्या माहितीचा एक समान आराखडा तयार करून देणे आवश्यक होते मात्र त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. केवळ १३ जिल्ह्यांच्याच संकेतस्थळावर मृतांचे आकडे दिसून येतात. एकूणच राज्य सरकारमध्ये जो समन्वयाचा अभाव सर्वत्र दिसून येतो तोच समन्वयाचा अभाव संकेतस्थऴावरील कामातून ही दिसून येतो.
जिल्हाधिकांऱ्याकडून जी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाला दिली जाते तिच माहिती माध्यमांना दिली जाते. हि माहिती जिल्हाधिकारी संकेतस्थळावर का देत नाहीत की यामध्ये काही लपवाछपवी केली जाते, असा प्रश्न यावेळी दिव्या ढोले यांनी उपस्थित केला.