मुक्तपीठ टीम
सांगली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आणि प्रयत्नातून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील सात वर्षाच्या हरवलेल्या मुलाच्या कुटुंबाचा शोध घेऊन सुखरूपपणे त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली व चाइल्ड लाईन यांच्या संयुक्त मोहिमेमुळे हरवलेल्या मुलाच्या आई-वडिलांशी संपर्क करुन त्याची पालकांशी भेट घडविणे शक्य झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या अल्पवयीन मुलाचा घरगुती वाद झाल्यामुळे तो घरातून निघून गेला. तो रेल्वेने विनातिकीट प्रवास करत असताना मिरज पोलिसांना मिळून आला. याबाबत मिरज येथील चाईल्ड लाईनच्या कार्यकर्त्यांनी सांगली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क केला. सांगली विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या.प्रवीण नरडेले यांनी अहमदनगर प्राधिकरणच्या सचिव रेवती देशपांडे यांच्याशी संपर्क करून मुलाच्या पालकांचा शोध घेण्याबाबत ई-मेल द्वारे कळविले. या ई-मेल ची दखल घेऊन नगर प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी स्थानिक समिती आणि पोलिसांच्या मदतीने पालकांचा शोध घेतला.
मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत सदर मुलाला वरीष्ठस्तर दिवाणी न्या.एल.डी.हुली यांच्या हस्ते , प्रमुख न्यायदंडाधिकारी न्या.पद्माकर केस्तीकर व विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. प्रवीण नरडेले यांच्या उपस्थितीत भेटवस्तू देऊन त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. यासाठी सांगली जिल्ह्या न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्या. ए. एस. राजंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. प्रवीण नरडेले, नगर विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. रेवती देशपांडे, सांगली विधी सेवा प्राधिकरणाचे सचिन नागणे, नितीन आंबेकर, सौ. किरण भोसले आणि चाईल्ड लाईनचे दादासाहेब यादव यांनी परिश्रम घेतले. या सर्वांच्या अथक प्रयत्नामुळे बालकाच्या पालकांचा शोध घेऊन त्याला सुखरूप पणे त्याच्या पालकांच्या ताब्यात देणे शक्य झाले. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.