मुक्तपीठ टीम
देशातील घरोघरी व प्रत्येक नागरीकांपर्यत संविधान गेले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार, विचार जनमानसात रुजवण्याचे कार्य शिक्षक करू शकतो. याच जाणीवेतून संविधान प्रत वितरित करण्याचा कार्यक्रम शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येत आहे. असाच एक कार्यक्रम अंधेरीतील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल कनिष्ठ महाविद्यालयात पार पडला.
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना परिषदेच्या माध्यमातून अथक परिश्रम घेऊन लिहिलेली भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १ ९ ४ ९ रोजी देशाला अर्पण केली . भारताची लोकशाही , न्याय , समता , स्वातंत्र्य , बंधुता ही मूल्य आणि राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्यासाठी संविधान जागृतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे . सर्व सामान्य जनतेला आपल्या न्याय हक्कांची , संवैधानिक अधिकारांची व कर्तव्यांची जाणीव व्हावी यासाठी भारताचे संविधान त्यांना सहज उपलब्ध होणे गरजेचे आहे. लोकशाहीला व राष्ट्राच्या ऐक्याला मजबूत करण्यासाठी संविंधान वितरणाचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाने लोकशाही मूल्य व्यवस्था समाजात रूजण्यास व बळकट होण्यास मदत होईल.
या उपक्रमाचा भाग म्हणून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या निवासी शाळेत संविधान वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला. शाळेचे मुख्याध्यापक गोविंदराजन श्रीनिवासन यांच्या हस्ते संविधानाची प्रत शिक्षकांना देण्यात आली.
“आजचा विद्यार्थी देशाचे उद्याचे उज्ज्वल भविष्य आहे. महामानव डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारातून व कृतीतून सामाजिक क्रांती केली. त्यांचे विचार समाजात रुजवण्याचे व प्रसारित करण्याचे कार्य शिक्षकांचे आहे,” असे प्रतिपादन मुख्याध्यापक गोविंदराजन श्रीनिवासन यांनी केले.