मुक्तपीठ टीम
कानपूरमधील राष्ट्रीय साखर संस्थेने सध्या सुरू असलेल्या एका विशेष मोहिमेचा २.० भाग म्हणून, देशभरातील राम कृष्ण मिशनच्या शाळांमध्ये १०० कापडी पिशव्या दान केल्या.प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्यासाठी,या पिशव्यांवर ‘प्लास्टिकचा वापर करू नका’ असा संदेश छापण्यात आला आहे.
राष्ट्रीय साखर संस्थेच्या (नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट) संचालकांसह संस्थेच्या इतर अधिकाऱ्यांनी मिशनचे स्वामी आत्मश्रद्धानंद यांची भेट घेतली आणि प्लास्टिक प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यावर आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये त्याबाबत संवेदनशीलता जागृत करण्यावर भर दिला,जेणेकरून सर्वांनी एकत्रितपणे पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावावा.वर्षभर जिथे मोठ्या संख्येने भक्त येतात,अशा आपल्या आश्रमांमध्ये अशाच प्रकारे संवेदनशीलता मोहीम राबवावी अशी विनंती संस्थेच्या अधिका-यांनी यावेळी मिशनला केली.
यावेळी आश्रमाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या दवाखान्यासाठी विविध प्रकारचे कचऱ्याचे डबे, स्वच्छतेचे साहित्य आणि जंतुनाशकेही संस्थेतर्फे देण्यात आली. भविष्यात कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सतत सहकार्य करण्याचे आश्वासन संस्थेचे संचालक नरेंद्र मोहन यांनी यावेळी दिले.
स्वामी आत्मश्रध्दानंद यांनी यावेळी प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्यासाठी आणि त्या जागी पर्यावरणपूरक उत्पादने वापरण्याचा संदेश देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.