मुक्तपीठ टीम
गृहमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतलेले दिलीप वळसे पाटील यांनी पदभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी आपले धोरण स्पष्ट मांडले आहे. ते म्हणालेत, “पोलीस खात्यात स्वच्छ प्रशासन देण्याचा माझा प्रयत्न राहिल. प्रशासकीय कामात माझ्या बाजूने राजकीय हस्तक्षेप असणार नाही. शक्ती कायदा, पोलीस भरती गतीमान करणे, पोलीस घरांचा विषय यांना माझ्या प्राधान्यक्रमात वरचे स्थान असेल.”
वळसे पाटलांवर गृहमंत्रीपदाची जबाबदारी ज्या परिस्थितीतून आली त्यामुळे त्यांना पोलीस अधिकाऱ्यांच्या राजकीय संबंधांचा प्रश्न विचारला डाणे स्वाभाविकच होते. पोलीस दलात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अधिकारी असून ते भाजपाशी निष्ठा बाळगून काम करत असल्याबाबत दिलीप वळसे – पाटील यांना विचारण्यात आलं . “कुणाची निष्ठा काय आहे, कुणावर आहे हे येत्या काळात तपासून पाहिलं जाईल. योग्य ती माहिती घेतली जाईल आणि त्यावर निर्णय घेतला जाईल”, असं दिलीप – वळसे पाटील यांनी बजावले आहे.
गृहमंत्री वळसे पाटील यांनी मांडलेले मुद्दे:
- सध्याचा काळ अवघड, आणि आव्हानात्मक आहे.
- कोरोनामुळे पोलीस दल रस्त्यावर कार्यरत आहे.
- कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबर, कोरोनाचं आव्हान पोलिसांसमोर आहे.
- या महिन्यात विविध धर्मियांचे सण आहेत.
- कोरोनाचा अंदाज पाहिला तर या महिन्यात आणखी आव्हानात्मक परिस्थिती असणार आहे.
- सगळ्यांच्या वेगवेगळ्या अपेक्षा त्यात आहेत.
- सर्वसामान्यांना न्याय मिळायला हवा आणि पोलीस दलाबाबत विश्वास वाटायला हवा, यासाठी सामान्य माणसाला केंद्रीभूत ठेऊन काम करण्याचा माझा प्रयत्न राहील.
सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार!
दरम्यान, उच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार आव्हान देणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. मात्र, न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सीबीआय असो किंवा एएनआय असो, सर्व यंत्रणांना संपूर्ण सहकार्य केलं जाईल, असंही ते म्हणाले .
गृहमंत्रिपदी आता नवा वसुली मंत्री कोण ? भाजपाची टीका
यांनी कुणी काय आरोप करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पारदर्शक कारभार महाराष्ट्राला देण्याचा माझा प्रयत्न आहे, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं . येत्या काही दिवसांत सचिव अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं .