कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जागतिक मान वाढणारी बातमी आहे. मालवणमधील धामापुर तलावाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवण्यात आलंय. वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट म्हणून धामापुर तलावाची निवड करण्यात आलीय.
धामापुर गावची तहान भागवणाऱ्या तलावाने गावाला आंतरराष्ट्रीय ओळखही मिळवून दिली आहे. प्राचीन धामापुर तलावाचे वैभव आणि संस्कृती संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी गेली अनेक वर्षे धामापुर येथील स्यमंतक संस्था जीवन शिक्षण विद्यापीठ प्रयत्न करीत आहे. त्यांच्या प्रयत्नांना हे यश आले आहे. इंटरनॅशनल कमिशन ऑन इरिगेशन अँड ड्रेनेज म्हणजेच आयसीआयडीद्वारे धामापुर तलावाची वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट साठी निवड केली गेलीय.
महाराष्ट्र राज्याला हा पुरस्कार पहिल्यांदाच मिळाला आहे. सिडनी येथे होणाऱ्या २०२० सालच्या ७२ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये जगातील चौदा साइट्सना वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साइट म्हणून पुरस्कृत केले जाणार आहे. याआधी तेलंगणातील सदरमकट्ट आनिकट्ट आणि पेड्डा चेरूवू या ठिकाणांना वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साइट म्हणून पुरस्कृत केले गेले होते. यंदा भारतातील आंध्रप्रदेशमधील कुंबम तलाव के. सी. कैनल, पोरुममिला टैंक आणि महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धामापुर तलाव यांना हा मान प्राप्त होणार आहे.