मुक्तपीठ टीम
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA)ने एक महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अभूतपूर्व मानला जातो. भारतातील ९० वैमानिकांना बोईंग 737 मॅक्स विमान उडवण्यास मनाई केली आहे. या वैमानिकांना डीजीसीएच्या निकषांच्या पूर्तेतेसाठी पुन्हा प्रशिक्षण घ्यावे लागेल. डीजीसीएचे महासंचालक अरुण कुमार म्हणाले की, या सर्व वैमानिकांना बोईंग उडवण्यापूर्वी पुन्हा प्रशिक्षण घ्यावे लागेल. सिम्युलेटर प्रशिक्षणातील त्रुटी लक्षात आल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने हे पाऊल उचलले आहे. या वैमानिकांना नोएडात सिम्युलेटरचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
स्पाइसजेटकडे ११ बोईंग 737मॅक्स!
- एवढ्या मोठ्या संख्येने वैमानिकांना विमान उडवण्यापासून रोखल्यानंतर विमान कंपन्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
- स्पाइसजेट ११ बोईंग विमाने चालवते.
- त्यांच्या उड्डाणासाठी १४४ वैमानिकांची आवश्यकता आहे.
- स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, बोईंग 737मॅक्सवरील ६५० प्रशिक्षित वैमानिकांपैकी ५६० अजूनही उपलब्ध आहेत.
- त्यामुळे त्याच्या ऑपरेशन्सवर फारसा परिणाम होणार नाही.
अपघातानंतर बोईंग 737 MAX विमानांच्या उपयोगावर होती बंदी!
- अदिस अबाबाजवळ इथियोपियन एअरलाइन्स 737 MAX विमानाचा अपघात झाल्यानंतर तीन दिवसांनी, १३ मार्च २०१९ रोजी DGCAने बोईंग 737 MAX विमानाच्या उड्डाणावर बंदी घातली होती.
- या अपघातात चार भारतीयांसह एकूण १५७ जणांचा मृत्यू झाला होता.
- मात्र, अमेरिकास्थित विमान निर्माता कंपनी बोईंगने विमानात आवश्यक सॉफ्टवेअर सुधारणा केल्यानंतर डीजीसीएचे समाधान झाले.
- त्यानंतर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये विमानांवरील बंदी उठवण्यात आली होती.