मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काल झालेल्या सभेमुळे राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. कालच्या सभेतल्या भाषणातून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस, भाजपा आणि राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. याच टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस उत्तर सभा घेत आहेत. शिवसेनेच्या सभेपाठोपाठ आज भाजपच्या ‘उत्तर’ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर भारतीय युवा मोर्चाच्या वतीने मुंबईत सभेची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये ही सभा होणार आहे.
आज पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला करारा जबाब देणार, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कालच्या भाषणावर देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत टीका केली होती. जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा, असा इशाराच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता. आपल्या ट्विटमध्ये फडणवीस म्हणाले होते, “सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत, विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम…अरे छट..हा तर निघाला आणखी एक टोमणे बॉम्ब. जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा.”
फडणवीसांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले. आता आज होणाऱ्या भाजपच्या ‘उत्तर’ सभेत फडणवीस काय बोलणार? याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी ही सभा आयोजित केली नसल्याची माहिती भाजपाच्या काही सूत्रांनी दिली आहे.