मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्याविरोधी उमेदवाराला मतं दिल्याची बाब विधानपरिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी रेकॉर्डवर घेतली. शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी केलेल्या मागणीनुसार त्यांनी रेकॉर्डवर घेणे हे पुढील न्यायालयीन कारवाईसाठी आवश्यक असल्याचे सांगण्यात येते. मात्र, पुढे शिवसेना बंडखोर गटाचे पक्ष प्रतोद भरत गोगावले यांच्या मागणीनुसार त्यांच्या पक्षादेशाचा भंग करून शिवसेनेच्या १६ आमदारांनी मतदान केल्याची नोंद विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली. त्यात त्यांनी भरत गोगावलेंचा उल्लेख शिवसेना विधिमंडळ पक्षाचे प्रतोद असा केला, हे विशेष! त्यामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बंडखोर शिवसेना गटाला वेळीच दिलेला सल्ला कामी आल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपाचे उमेदवार अॅड. राहुल नार्वेकर यांची १६४ मतांनी निवड झाली त्यात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचीही मते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या आमदारांनी शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांना मत न देता भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मत दिलं, त्यांची नावं रेकॉर्डवर घेण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली. त्यांनी ती नावे, माहिती रेकॉर्डवरही घेतली.
त्यानंतर पुढील कामकाज सुरु होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाषण सुरु होताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे बसलेले शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते दीपक केसरकर, पक्ष प्रतोद भारत गोगावले यांना काही सूचना दिल्या. शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी बंडखोरांनी शिवसेनेविरोधात मतदान केल्याचे रेकॉर्डवर आणल्याचे गांभीर्य ओळखून बहुधा फडणवीसांनीच त्यांना सूचना केली. त्यानुसारच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री आणि अन्य नेत्यांची भाषणं झाल्यानंतर बंडखोर शिंदे गटाचे पक्ष प्रतोद भरत गोगावले यांनी तोपर्यंत अध्यक्षपदी विराजमान झालेले राहुल नार्वेकर यांच्याकडे नवी मागणी केली.
त्यानुसार भाजपा उमेदवाराला मत देण्याच्या त्यांच्या पक्षादेशाचा शिवसेनेच्या १६ आमदारांनी भंग केल्याची नोंद घेण्याची मागणी त्यांनी केली. विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्याची नोंद घेतल्याचे जाहीर केले. तसे करताना त्यांनी भरत गोगावले यांचा उल्लेख शिवसेना विधिमंडळ पक्षाचे प्रतोद असा केला. त्यामुळे एकप्रकार शिवसेना मूळ पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांच्याऐवजी विधानसभा अध्यक्षांकडून शिंदे गटालाच खरा शिवसेना विधिमंडळ पक्ष मानले जाण्याचे संकेत मिळत आहेत.
खालील लिंक क्लिक करा आणि वाचा आधीची बातमी