मुक्तपीठ टीम
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूजा चव्हाण प्रकरणी आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महिलांवरील अत्याचार वाढत असताना आरोपींवर नाही तर आंदोलन करणाऱ्या महिलांवरच कारवाईचा त्यांनी निषेध केला. तसेच महिला अत्याचाराचे विषय राजकारणापलीकडे असले पाहिजेत, असं सांगताना त्यांनी सरकार हे नेहमी पालकत्वाच्या भूमिकेत असलं पाहिजे असं सांगत अप्रत्यक्षरीत्या त्यांचे जुने मित्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजधर्माचीच आठवण करून दिली असल्याचे मानले जाते.
पूजा चव्हाण प्रकरणी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीन तासात तीन ट्विट करत मत मांडलं:
१
“राज्यात ठिकठिकाणी महिला अत्याचाराच्या सातत्याने वाढत असलेल्या घटना, पूजा चव्हाण या भगिनीला न्याय मागण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला,”
२
“सरकार दोषींवर कारवाई करीत नाही. पण, आंदोलन करणार्या महिलांचेच अटकसत्र राबविण्यात शासनाला धन्यता वाटते. भाजपाच्या महिला नेत्यांच्या छायाचित्रांशी छेडछाड करणार्या विकृतीवर कारवाईची तत्परता न दाखविता, केवळ आवाज दडपण्याच्या या दबावतंत्राचा आम्ही तीव्र निषेध करतो.”
३
“सरकार हे नेहमी पालकत्त्वाच्या भूमिकेत असले पाहिजे.
आमची मागणी आहे की, केवळ दबावाचे, गळचेपीचे राजकारण न करता सरकारने आधी दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी. महिला सुरक्षेचे विषय तरी किमान राजकारणाच्या पलिकडे असले पाहिजे.”