सुमेधा उपाध्ये
माणूस म्हटले की इच्छा या अल्याच. जो पर्यंत या मृत्यू लोकात आपण आहोत तो पर्यंत इच्छा आहेत. किंबहुना इच्छा या माणसाच्या जन्मासोबतच येत असतात. त्यांचा अधिक संबंध हा आपल्या शरीराशी आहेच. या इच्छा असणं योग्य की अयोग्य यासंदर्भात अनेक विद्वानांनी स्वत:ची मत मांडली आहेत. लाखो शब्द यासंदर्भात लिखित आहेत. इच्छा असू नयेत त्या कमी कराव्यात, त्यांचे दमन करावे कारण इच्छेच्या पोटी दु:खाची निर्मिती होते. इच्छांना अंत नाही वगैरे सांगणारे खूप काही आपण वाचत आलोय ऐकत आलो आहोत. प्रत्येकाचे मत वेगवेगळ्या पद्धतीने समोर आले आहे. पण याचा विचार करताना असं वाटतं की इच्छा आहे म्हणून आपण कर्म करतो, त्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न करतो. इच्छाच नसेल तर माणूस तसा निष्क्रियतेकडे झुकू शकतो. त्यामुळे इच्छा असणं वाईट नाही तर त्यासाठी कोणा कडून अपेक्षा ठेवू नयेत, हे योग्य वाटतं. कारण इच्छा ही आपली असते आणि अपेक्षा ही समोरच्यांकडून म्हणजेच दुस-यांकडून ठेवली जाते. इच्छेच्या पोटी दु:ख असंत म्हणतात पण अपेक्षांच्या पोटी ते जास्त असतं. त्यामुळे इच्छा हे आपल्यातील प्राणशक्तिच्या अस्तित्वाची खूण आहे. कारण इच्छा आहेत म्हणून हे शरीर त्यासाठी आहे. हे शरीर आहे म्हणून त्यात प्राणशक्ती आहे. प्राणशक्तिच्या माध्यमातूनच आपण चैतन्याशी जोडले गेलेले आहोत. शरीरात प्राण आहे. प्राणासाठी शरीर आवश्यक आहे. म्हणजेच आपल्यातील चैतन्य आणि चराचरातील चैतन्य यांच्यातील एकत्व साधण्याचं माध्यम शरीर आहे. हे शरीर टिकवायचे तर त्यासाठी इच्छा आल्या आणि त्या इच्छा पूर्ण करणंही आलंच. मात्र, आपल्या इच्छांच्या पूर्ततेच्या मार्गातील अडथळे दु:ख निर्माण करतात.
इथं ऐकलेली एक गोष्ट आठवली ती म्हणजे- एका सिद्ध महात्म्याने एकदा नारळाचे पाणी मागितले एरवी ते दुध आणि मध एकत्र करून घेत असत. पण त्यांनीही शरीर धारण केलेलं असल्यानं त्यांनाही इच्छा आहेतच. तर त्यांनी तसं त्यांच्या शिष्याला सांगितलं. पण त्या ठिकाणी लगेच नारळ पाणी उपलब्ध होईल अशी सोय नव्हती. पण थोड्याच वेळात तिथं एक व्यक्ती नारळाचे टोपले घेऊन आली आणि म्हणाली की हे आपल्यालाच देण्यासाठी आलोय. सिद्ध पुरूषांच्या इच्छा कशा लगेच पूर्ण होतात याचेच हे उदाहरण आहे. तसंच एकदा रामकृष्ण परमहंस यांना भजी खाण्याची इच्छा झाली. त्यांना भजी खूप आवडायची. अनेकदा ते स्वत: भजी करायला सांगायचे. तेव्हा एकाने प्रश्न उपस्थित केला एवढे मोठे सिद्ध पुरूष आहात पण भजी खाण्याची इच्छा काही जात नाही. त्यावर परमहंसांनी सुंदर उत्तर दिलं- इच्छा आहे म्हणून हे शरीर आहे. इच्छा संपल्या की शरीर संपलं. इच्छेचा संबंध शरीराशी आहे. शरीर संसाराचे आहे पण प्राण म्हणजेच श्वास हा परमात्म्याचा आहे. त्या परमात्म्याशी तादात्म्य पावायचे असेल तर हे शरीर टिकवायला हवं, हे प्राण आहेत म्हणून शरीर आणि शरीर आहे म्हणून प्राण आहे. चैतन्य आहे. एक भजी खाण्याची इच्छा आहे म्हणून अजून या देहात आहे. सर्व इच्छा संपल्या आहेत. ही इच्छाही सोडली तर शरीर संपेल आणि प्राणही जाईल. अनेकदा आपण म्हणतो कोणत्याही इच्छा नसाव्यात किंवा इच्छा या दु:खाचे मूळ आहेत. मात्र यात विसंगती अशी की आपण अपेक्षा आणि इच्छांना एकत्र ठेवून विचार करतो. अपेक्षा ठेवल्या नाहीत तर दु:ख नाही, असंही आपण म्हणू शकतो. पण हा विचारच व्यक्तिसापेक्ष आहे. परमात्म्यात विलीन व्हायचेय त्यासाठी प्राण महत्वाचे आहेत त्यासाठी हे शरीर महत्वाचे आहे त्याचे लाड करावेच लागतात. अनेकजणांच्या अनेक इच्छा असतात, त्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. इच्छा असणं योग्यच आहे त्यापूर्ण करण्यासाठी शंभर टक्के देणं महत्वाचं आहे. पण इच्छा किती आणि कशा असाव्यात तसंच अपेक्षांचं ओझं किती असावं याचा विचारही महत्वाचा ठरतो.
या भौतिक जगतातील सर्व कार्य करणं पण त्या परमात्मात्यात विलीन होण्याकडे कल असावा. सर्व कार्य करताना त्या परम चैतन्याचं सतत स्मरण ठेवावं. जे चैतन्य आपल्या आत आहे तेच बाहेर आहे. त्याला प्राप्त करायचे तर शरीरात चैतन्य हवं, चैतन्य प्राणात आहे. सर्व नाती गोती सांभाळणं क्रमप्राप्त आहे. आपले प्रत्येक जन्मातील देणे-घेणे हे पूर्ण करण्यासाठी सर्वांशी संबंध आहे. तो या शरीरामुळे आहे. या शरीराचा आणि आत्म्याचा संबंध नाही. शरीर शरीराचा धर्म पाळेल. आपल्या सभोवती सर्व आहेत, सर्वांचे संबंध या स्थूल देहाशी म्हणजेच शरीराशी आहेत. आत्म्याशी नाहीत. या सगळ्या कार्यात कोणत्याही अपेक्षा ठेवू नयेत, हे महत्वाचं आहे. आपल्या सोबत सर्व आहेत, त्यांच्याशी नाती आहेत पण ती या शरीराने जोडले गेलेत ते आपले दु:ख किंवा आपले शरीराचे त्रास वाटून घेऊ शकत नाहीत. आपल्या गोतावळ्यासाठी सर्व छान करण्यासाठी त्यांच्यासाठी सर्व आवश्यक ते-ते करणं. पण यासाठी हे शरीर स्वस्थ असावं, या शरीराचे लाड त्यासाठी करायचे. ते फक्त त्यात असलेल्या प्राणासाठी. कारण ही प्राणशक्तीच आपल्याला परमात्म्याशी जोडणार आहे. त्यामुळे आयुष्य जगताना सतत इच्छांना दोष देऊन काहीच साध्य होणार नाही. त्यापेक्षा अत्यंत आनंदाने अलिप्त राहून अपेक्षा विरहीत कर्म केलेच पाहिजे. हे युग कर्मप्रधान आहे. कर्माशिवाय एकमेंकांचे ऋण कसे फेडणार? म्हणून ऋण संपवून पुढचा मार्ग प्रश्स्त करायचा आहे.
(सुमेधा उपाध्ये या पत्रकारितेतील दीर्घ अनुभवानंतर आता सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)
Khul chan lekh