मुक्तपीठ टीम
वरळीतील सिलिंडर ब्लास्ट घटनेतील जखमी चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू हा मनपाच्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच झाला असा आरोप भाजपाने केला आहे. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सपाने रुग्णालयाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. तर रुग्णालयातील रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मुंबई मनपा वेतन देते, तरीही ते उपचार करण्याकडे डॉक्टर लक्ष देत नाहीत, तर खासगीत जास्त लक्ष देतात, असा आरोप करण्यात आला. त्यामुळे मनपा सेवेतील डॉक्टरांची खासगी प्रॅक्टिस बंद करण्याची मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली.
डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिसवर बंदी घालावी, जेणेकरून मुंबई मनपाच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना चांगले उपचार मिळू शकतील. मुंबई मनपाचे विरोधी पक्षनेते रवी राजा म्हणाले की, दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. मनपा रुग्णालयांमध्ये असा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही.
‘स्थायी समितीत संताप
- तत्पूर्वी, भाजपा नगरसेवकांनी नायर रुग्णालयाला भेट देऊन अचानक पाहणी केली, त्यात बहुतांश एचओडी ओपीडीतून गैरहजर होते.
- याचा निषेध करत भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीची सभा तहकूब करण्याची मागणी केली.
- सभा सुरू होताच सभागृह नेत्या शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांनी नायरच्या मुद्द्यावरून सभा तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडला.
- त्यानंतर या विषयावर चर्चा झाली.
- अशा निष्काळजीपणामुळे मनपाची प्रतिष्ठा मलिन होतेय, असे राऊत म्हणाल्या. दोषींना शिक्षा झाली पाहिजे.
- रवी राजा म्हणाले की, अशी घटना पहिल्यांदाच समोर येत नाहीये.
- यापूर्वीही मनपा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर आला आहे.
- मनपा आयुक्त अशा लोकांवर कडक कारवाई का करत नाहीत?
- नायर रुग्णालयातील दोषींवर फौजदारी गुन्हा नोंदवून कारवाई करावी.
शिवसेनेला फक्त पेंग्विन दिसतात!
- त्यांना फक्त पेंग्विन दिसतात, असे म्हणत भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी शिवसेनेवर ताशेरे ओढले. पेंग्विनच्या संगोपनावर दररोज दीड लाख रुपये खर्च केले जात आहेत, मात्र एका बालकाचा मृत्यू होत असून त्याला आर्थिक मदत देण्याबाबत कोणीही बोलत नाही.
- निष्काळजीपणामुळे ज्या कुटुंबाच्या मुलाचा मृत्यू झाला, त्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष किंवा कोणताही नेता गेला नाही. मनपा दरवर्षी आरोग्य सेवेवर ४५०० कोटी रुपये खर्च करते, मात्र रुग्णालयांचे वास्तव हेच आहे.
याबाबत स्थायी समिती सभापती यशवंत जाधव यांनी चिंता व्यक्त केली. पालिकेने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि त्याचा अहवाल स्थायी समितीसमोर मांडावा, असे ते म्हणाले.