मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय महाकवी,लोकशाहीर,लोककवी वामनदादा कर्डक यांची १५ ऑगस्ट २०२१ रोजी ९९ वी जयंती देशभर साजरी होणार असून आगामी १५ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२३ हे महाकवी लोककवी वामनदादा कर्डक यांचे जन्म शताब्दी वर्ष “भारतीय संविधान शाहिरी वर्ष” म्हणून साजरे करावे असे आवाहन लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक महाराष्ट्र संस्थेचे संस्थापक कार्याध्यक्ष शरद दि.शेजवळ यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
लोकशाहीर वामनदादा कर्डक यांनी भारतीय संविधानिक मूल्य समता,स्वातंत्र्य, न्याय,बंधुता,धर्मनिरपेक्षता,राष्ट्रवाद,वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या शाहिरी कवण गीतातून लोक माणसात रुजवला व बुद्ध-कबीर, तुकोबा, शिवबा, फुले,शाहू-आंबेडकरांचा सामाजिक प्रबोधनाचा विचार आपल्या शाहिरीतून जनमानसात रुजवला आहे. तरुणांच्या ओठावर सामाजिक प्रबोधनाचे गीत रुजवणे व संविधानिक विचार मूल्यांचा प्रचार-प्रसार या संविधान शाहिरी वर्षात करण्याचा मनोदय शरद शेजवळ यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने पुढाकार घेऊन कोरोना संसर्गाच्या नियमांचे पालन करत ऑनलाईन/ऑफलाईन विविध उपक्रम,योजना,व्याख्याने,गीतगायन,परिसंवाद-चर्चासत्र इत्यादी आयोजन करून जीवनभर बुद्ध-आंबेडकरी परिवर्तनाचा विचार-वारसा तथा संविधान मूल्य विचार-प्रचार-प्रसार करणाऱ्या महाकवी वामनदादा कर्डकांची ९९ वी जयंती वैचारिक-उद बोधनपर कार्यक्रम आयोजित करावेत व दादांच्या साहित्य,कवण,गीत यावर अभ्यासकवृत्तीने रसग्रहण करून त्यांच्या साहित्य शाहिरीचे अनुकरण, अनुपालन,प्रचार प्रसार करावा असे आवाहन लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक महाराष्ट्रच्या वतीने जनतेस करण्यात येत आहे.
वामनदादा कर्डक यांच्या जीवन कार्याला उजाळा देत या परंपरेतील गायक,कवी,संगीतकार कलावंत यांचा सन्मान-सत्कार करावा व या माध्यमातून भारतीय संविधानिक मूल्य विचारांचं प्रचार-प्रसार करावा असे आवाहन लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक महाराष्ट्र च्या वतीने शरद शेजवळ यांनी महाराष्ट्र राज्य सरकार ला पाठविलेल्या निवेदनात ही केले असल्याचे प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकार केला आहे.