मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोक्याची भीती आहे. कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस या नवीन व्हेरियंटमुळे तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) चेन्नईमध्ये नुकत्याच केलेल्या अभ्यासात डेल्टा प्लसबद्दल नवी माहिती समोर आली आहे. या अभ्यासात असे आढळून आले आहे की, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही देखील डेल्टा प्लस या नवीन व्हेरियंटची लागण होत आहे. यासोबतच ज्यांना आधी कोरोनाचा संसर्ग नाही झाला, त्यांनादेखील लागण होण्याची क्षमता या व्हेरियंटमध्ये आहे. पण ज्यांनी ज्यांचे लसीकऱण झाले त्यांच्यासाठी कोरोनाच्या नव्या रुपाची लागण प्राणघातक ठरत नाही.
आयसीएमआर – इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च द्वारे हा अभ्यास करण्यात आला आणि १७ ऑगस्टला जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला.
आयसीएमआरच्या अभ्यासामधील निष्कर्ष
- डेल्टा प्लस या व्हेरियंट चा प्रसार लस घेतलेल्या आणि न घेतलेल्या दोन्ही प्रकारच्या समूहामध्ये दिसुन येत आहे.
- कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटमुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे.
- भारतात कोरोनाची दुसरी लाट असताना डेल्टा प्लसचे काही रुग्ण आढळुन आले होते.
- आता परत काही राज्यांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत.
नमुन्याचा आकार लहान असल्याने त्यांनी कोरोनाचा दोनदा संसर्ग झालेल्या रुग्णांना या अभ्यासात समाविष्ट केले नाही. कारण अशा व्यक्तींची संख्या खूपच कमी होती. त्यासोबतच लसीकरणानंतर परत कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींचे वर्गीकरण केले नव्हते. तरीही लसीकरण केलेल्या गटांमध्ये गंभीर रोगांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढवणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होते, असे स्पष्ट करण्यात आले.
लसीकरणामुळे मृत्यूदरात घट
- पूर्ण लसीकरण झालेल्या गटात कोणीही मृत्यू पावले नाही.
- अंशतः लसीकरण केलेल्या ३ रुग्णांचा, तर लसीकरण न केलेल्या ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
- मे मध्ये हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर तमिळनाडूच्या आरोग्य विभागाकडे सोपवण्यात आला.
- भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान चेन्नईमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते.
- जिथे मे २०२१ च्या पहिल्या ३ आठवड्यात दररोज जवळ-जवळ कोरोनाचे ६००० रुग्ण आढळून येत होते.