मुक्तपीठ टीम
“भावनांची देवाणघेवाण न करता विवाह हे केवळ कायदेशीर बंधन आहे. पती-पत्नीला केल कायदेशीर बंधनात बांधून ठेवणे म्हणजे त्यांच्यापासून आयुष्य जगण्याची संधी हिरावून घेणे होय. हे वैवाहिक बंधन टिकून राहणे हे अपीलकर्त्यासाठी अत्यंत मानसिक क्रूरता आहे.” एका महिलेला घटस्फोट मंजूर करताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.
न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती जसमीत सिंग यांच्या खंडपीठाने घटस्फोट मंजूर न करण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवत म्हटले आहे की, सध्याच्या अपीलमध्ये दोन्ही पक्ष घटस्फोट मंजूर केल्यास नवीन आयुष्य सुरू करू शकतात.
न्यायालयाने सांगितले की लग्नाचा उद्देश दोन आत्म्यांना एकत्र आणणे आहे. आनंदात, दु:ख, यशात आणि संघर्षात एकमेंकाना साथ देतात. ते त्यांच्या भावनिक, मानसिक आणि शारीरिक उपस्थितीने जगतात. जीवनाच्या या प्रवासात ते वैयक्तिक, सामाजिक आणि आध्यात्मिक बंध तयार करतात, भविष्यासाठी योजना आखतात.
खंडपीठाने सांगितले की, सध्याच्या प्रकरणात लग्नानंतर काही काळ वगळता दोन्ही पक्ष एकत्र राहत नाहीत. पतीने पत्नीला परस्त्री म्हणून वागवले, फक्त तिचा तात्पुरता साथीदार म्हणून वापर केला.
खंडपीठाने सांगितले की, पत्नी शिकलेली आहे आणि MNC मध्ये काम करते. ११ वर्षांच्या कालावधीत दोघे काही दिवस एकत्र राहिले, जेव्हा नवरा कॅनडाहून सुट्टीवर आला होता. नवऱ्याच्या वागण्यावरून असे दिसून येते की लग्न वाचवणे हे त्याचे प्राधान्य नव्हते.एवढेच नाही तर पतीने पत्नीच्या वडिलांवर गंभीर आणि निंदनीय आरोप केले आहेत, जे सिद्ध होऊ शकले नाहीत. आपल्या वडिलांवर असे निंदनीय आरोप करणाऱ्या माणसासोबत राहणे कोणत्याही स्वाभिमानी मुलीसाठी कठीण होईल. खंडपीठाने म्हटले की, “आमचे मत आहे की पतीचे उपरोक्त वर्तन अपीलकर्त्यावरील मानसिक क्रूरतेचे कारण आहे.
काय आहे प्रकरण?
- महिलेने कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत म्हटले की, त्यांचा आंतरजातीय विवाह ६ मे २०१० रोजी आर्य समाज मंदिर, जिल्हा बागपत, उत्तरप्रदेश येथे झाला होता.
- त्यावेळी ती लखनौ विद्यापीठात बीटेक करत होती तर तिचा नवरा कॅनडामध्ये राहत होता.
- लग्नानंतर नवरा कॅनडाला गेला आणि बऱ्याच वर्षांनी काही दिवसांसाठी भारतात आला.
- त्याच्यासोबत फिरल्यानंतर तो परत कॅनडाला जायचा.
- यादरम्यान पती तिच्यावर मानसिक आणि लैंगिक अत्याचार करत असे.
- दुसरीकडे पतीने हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.