मुक्तपीठ टीम
खरंतर या एका चांगल्या बातमीत दोन चांगल्या बातम्या आहेत. पहिली समाजमाध्यमांच्या सकारात्मक उपयोगाची. प्रीती एसके या ट्विटर हँडलने सोमवारी तीन ट्वीट्स केले. या तीन ट्वीट्समधून स्वप्निलची कहाणी कळली. मुक्तपीठच्या धोरणानुसार ती चांगली बातमी असल्यानं मांडत आहोत.
स्वप्नील मेहेंदळे हा कर्णबधिर तरुण आहे. तो पुण्यातील कर्वे नगर येथे राहतो. काहीशी कमतरता असली तरी स्वप्नीलचे कलागुण असे की तो कोणत्याही संपूर्ण धडधाकट असणाऱ्या कुणापेक्षाही जास्त जिद्दीनं आणि परिश्रमानं जीवन बहरवत आहे. आपण सारेच मातीच्या साध्या कुंड्या रोपांसाठी वापरतो. पण स्वप्नील त्या घरी आणून त्यावर चित्र काढून त्यांचं रुपच बदलतो. आणि मग त्या विकतो.
झाडे व फुले छान वाटतातच आणि कुंड्यावरील स्वप्नीलने अशी वेगवेगळे चित्रं काढलीत की त्या आणखीच छान आणि उठून दिसतात.
त्याचबरोबर स्वप्नील वारली आणि अन्य चित्रशैलीत भिंतींवरही चित्र काढतो. कॅनव्हासवरही चित्र काढतो. त्याच्या संवेदनशीलतेतून साकारणारी ही चित्र आपल्या घरांचं सौंदर्य अधिकच फुलवतात.
स्वप्नीलची कथा त्याच्याच शब्दात वाचण्यासाठी तसेच संपर्कासाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमधील या बातमीची लिंक क्लिक करून अधिक माहिती नक्की घ्या. या तरुणाला आपण साथ दिलीच पाहिजे. त्यातून आपलं घर सजेलच आणि त्याचं जीवनही फुलेल.
स्वप्नीलच्या शब्दात त्याची कहाणी…
नमस्कार
सुरुवातीला मी माझी ओळख सांगतो.. मी स्वतः कर्णबधिर आहे.. मला ऐकू आणि बोलायला कमी येते. मी कर्वेनगर पुण्यात राहतो. मला लहानपणापासून चित्रकलेची आवड आहे. मी मागे सदाशिव पेठेत निंबाळकर तालीम जवळ आपटे चित्रकला क्लासला शिकत होतो. तिथे ३ वर्ष pencil sketch, color paint, अशी बरीच चित्र काढायला शिकलो. त्यानंतर फेसबुकवर BBN, घे भरारी आणि गार्डन ग्रुप वर होतो. गार्डन ग्रुपवर माहिती बघता बघता माझ्या डोक्यात एक विचार आला, कुंड्यांवर चित्र काढून टाकून बघूया आणि त्यातून विकण्याचा व्यवसाय सुरू करूया.
मग मी गार्डन शॉपवर जाऊन ४-५ कुंड्या आणल्या आणि त्यावर कलर मारून चित्र काढून फेसबुक वर टाकलं.
त्यातून मला प्रचंड रिस्पॉन्स आणि ऑर्डर मिळाल्या. तिथून हळू हळू मी दिवाळीत पणत्या रंगवून विकणे, हँडमेड कंदील बनवून विकणे असे छोटेसे व्यवसाय सुरू केले. त्यानंतर BBN ग्रुप मधल्या एका मॅडमने भिंतीवर वारली पेटिंग करायला ऑर्डर दिली होती. तो माझा पहिला प्रयत्न असून मी व्यवस्थित आणि सुंदर वारली पेटिंग केले.. आणि ते पण फेसबुकवर टाकून बघितले. त्यातसुद्धा मला चांगला रिस्पॉन्स आणि ऑर्डर्स मिळत गेल्या.
तिथून मी दिवाळीसाठी पणत्या रंगवणे, कंदील बनवणे, कुंड्या पेंट करणे, वारली पेटिंग करणे, काचेची बॉटल पेटिंग करणे हा व्यवसाय सुरू केला. आता तीन वर्ष झाली हा व्यवसाय सुरु करून.चांगला रिस्पॉन्स आणि ऑर्डर मिळत आहेत. आपलंही घर सजवण्यासाठी मला माझ्या कलासाधनेच्या माध्यमातून सहकार्य करायला नक्कीच आवडेल.
धन्यवाद!
स्वप्नीलच्या कलेचा आपल्या घरांना, कार्यालयांना सजवण्यासाठी नक्की उपयोगात आणा:
सध्या स्वप्नील फक्त पुण्यातच हे पुरवतो. तो कर्णबधिर असल्यामुळे फोनवर बोलू शकत नाही. व्हाट्सअँपवर अधिक माहिती देऊ शकतो. केवळ पुण्यामध्ये राहणाऱ्यांची संपर्क साधावा.
स्वप्नील मेहेंदळे:- 8329884779
त्याला मॅसेज केल्यास तो व्हॉट्सअॅपवर अधिक माहिती व फोटो पाठवतो.
@SwapnilMehenda4 हे स्वप्नीलचे ट्विटर हँडल आहे, तुम्ही ट्वीटरवरही त्याला संपर्क करू शकता.
ही चांगली बातमी ट्वीटरवरील @PreetiSK1103 यांनी ट्वीट केल्यामुळे कळली. त्यांना मुक्तपीठ टीमतर्फे मनापासून धन्यवाद!