मुक्तपीठ टीम
देशाचा राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक इतिहास हा दलितांविना पूर्ण होऊच शकत नाही, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी केलं आहे. ते ‘मेकर्स ऑफ मॉडर्न दलित हिस्ट्री’ या पुस्तकाच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. ते म्हणाले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा आरक्षणाचा कट्टर समर्थक आहे. हा सकारात्मक मार्ग आहे. जोपर्यंत समाजातला विशिष्ट घटक असमानतेचा अनुभव घेत आहे तोपर्यंत हा मार्ग अवलंबला पाहिजे.” या कार्यक्रमाचं आयोजन इंडिया फाऊंडेशनने केलं होतं.
आरक्षणाबाबत बोलताना होसबळे यांनी स्पष्टपणे सांगितले की, ते आणि त्यांची संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरक्षणाचे कट्टर समर्थक आहेत. “सामाजिक सामंजस्य आणि सामाजिक न्याय ही आमच्यासाठी राजकीय रणनिती नाही आणि दोन्ही आमच्यासाठी विश्वासाची बाजू आहे. आरक्षण आणि समन्वय समाजातील सर्व घटकांमध्ये एकत्र असायला हवे.”
समाजात सामाजिक बदलांचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना दलित नेते म्हणणं अन्यायकारक असेल, कारण ते संपूर्ण समाजाचे नेते होते. जेव्हा आपण समाजातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या विविध पैलूंवर चर्चा करतो, तेव्हा निश्चितपणे आरक्षणासारखे काही पैलू समोर येतात. आमची संघटना आणि मी अनेक दशकांपासून आरक्षणाचे समर्थक आहोत. जेव्हा अनेकवेळा आरक्षणविरोधी निदर्शनं होत होती, तेव्हा आम्ही पाटण्यात आरक्षणाच्या बाजूने एक ठराव मंजूर केला आणि एका चर्चासत्राचे आयोजन केले, असंही ते म्हणाले.