मुक्तपीठ टीम
दररोज एक रोप लागवड चळवळ. होय, महाराष्ट्रात सध्या अशीही एक हिरवाईची चळवळ शांतपणे सुरु आहे. कुणाचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस…निमित्त काहीही असो निसर्ग सेवा गटाचा दररोज एक रोप लावायचंच असा निर्धार. त्यातून ठरवलं गेलं वर्षेभरात किमान ३६५ रोप लागवडीचं लक्ष्य. जे चार महिन्यात साध्य झालं. आता पुढचं लक्ष्य ५०० झाडांचं.
निसर्ग आपला सखा. निसर्ग आपला तारणहार. आपण जर निसर्गाला जपलं तर तो आपल्याला कायम जपेल. अशा निसर्गाच्या सेवेत मग्न असणारी अनेक निसर्गप्रेमी आहेत.
सरकारी वन खात्यात काम करणारे शिवसांब घोडके म्हणजे निसर्गावर प्रेम करणारा अवलिया, असाच एक. निसर्गाचा अभ्यास, निसर्गाचा ध्यास घेतलेल्या शिवसांब घोडके सातत्यानं निसर्ग सेवेत मग्न असतात. निसर्ग जोपासना आणि संवर्धनासाठी ‘दररोज एक रोप लागवड चळवळ’ सुरु करण्यात आली. चळवळीच्या शुभारंभी लावलेले पहिले रोप अतिशय सुंदर पद्धतीने वाढत आहे. ही चळवळ हवीहवीशी वाटणारी आहे. कुणाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, कुणाच्य लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने, प्रिय व्यक्तींच्या स्मृतीत…रोजच काही तरी निमित्ताने वृक्षारोपण करण्यात येते.
एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने ३२ देशी रोपांची लागवड नुकतीच करण्यात आली. गावातील जेष्ठ नागरिक व निसर्ग सेवा गटातील सदस्य यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोप लागवड केली गेली. गावातील प्रतिष्ठित नागरिक व निसर्ग सेवा गटातील सक्रिय निसर्ग सेवक यांनीही लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने रोप लागवड केली. या चळवळीने वर्षभरात ३६५ रोपांच्या लागवडीचे लक्ष्य ठरवले होते, पण ते अवघ्या चार महिन्यातच पूर्ण झाले. आता पुढचं लक्ष्य ५०० झाडांचं ठरवलं आहे.
आपणही आपल्या परिसरात रोप लागवड व संरक्षण संवर्धन चळवळ सुरू करा, असे आवाहन चळवळीच्या टीमने केले आहे.