मुक्तपीठ टीम
सांगली जिल्ह्यातील चोपडेवाडी येथे कृष्णा नदीच्या पात्रात पाणी पिण्यासाठी गेलेल्या घोड्यावर मगरीने झडप मारून पाण्यात ओढून नेले. या घेटनेत घोड्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. मागील काही वर्षात पलूस आणि मिरज तालुक्यात नदीकाठावर मगरीने अनेकांवर हल्ला केला आहे.
नेमकं काय घडलं?
- चोपडेवाडी येथील उदय मोरे यांचा मुलगा आर्यन हा घोड्याला घेऊन चारण्यासाठी कृष्णा नदीच्या पाणवट्यावर घेऊन गेला होता.
- त्यावेळी घोडा चरत-चरत नदीच्या काठावरती पाणी प्यायला गेला.
- याचवेळी पाण्यात असलेल्या मगरीने घोड्यावर झडप घालून काही कळायच्या आत त्याला पाण्यात ओढून घेतले.
- यावेळी हातात घोड्याची दोरी घेऊन उभे असलेले उदय मोरे यांनी घोड्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.
- परंतु मगरीच्या ताकदीपुढे त्यांचे काही चालले नाही.
- आजूबाजूला असणाऱ्या मच्छिमारांनी आरडा-ओरडा करून घोड्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.
- सायंकाळी ७ वाजेपर्यंत येथील नागरिकांनी घोड्याचा शोध घेतला.
- परंतु घोडा सापडला नाही.
याआधीही मगरीचा प्राणी आणि महिलेवर हल्ला!!
- याआधीही या भागात मगरीने प्राणी आणि महिलांवर हल्ला केला आहे.
- दोन महिन्यांपूर्वी येथे चरायला आलेल्या मेंढ्यांवर हल्ला करून दोन मेंढ्यांना ओढून नेले होते.
- तर आठ महिन्यापूर्वी येथे कपडे धुवत असलेल्या महिलेवरसुद्धा हल्ला करून हाताला मोठी इजा केली होती.दैव बलवत्तर म्हणून त्या महिलेचा जीव मगरीपासून वाचला होता.
- आतातरी या भागात वनविभागाने लक्ष देऊन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना कराव्यात, अशी येथील स्थानिक नागरिकांची मागणी आहे.