मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला तौक्ते चक्रीवादामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी १ हजार कोटींची मदत देऊ केली. महाराष्ट्रातही चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले असून महाराष्ट्राला मात्र जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करण्यात आली. या दरम्यान मोदी महाराष्ट्रालाही देतील! उगाच वाद कशाला? असा टोला आज शिवसेनेच्या मुखपत्रातून लगावला आहे. आज सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर लक्ष्य करण्यात आलं आहे.
सामनाच्या अग्रलेखात नेमंक काय
गुजरातला एक हजार कोटी देणाऱ्या केंद्राने महाराष्ट्र आणि गोव्याच्या बाबतीत भेदभाव का करावा? पंतप्रधान आईच्या ममतेने गुजरातेत गेले. तीच ममता महाराष्ट्राच्या वाट्याला थोडीफार आली असती तर वादळग्रस्तांच्या मनाला उभारी आली असती. मुख्यमंत्री ठाकरे आज कोकणच्या दौऱ्यावर निघाले आहेत. वादळाने लोकांच्या चुली भिजल्या व विझल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्कीच विझलेल्या चुली पेटविण्याचे बळ देतील. पंतप्रधान मोदी यांनी गुजरातला हजार कोटी दिले म्हणून बोटे मोडायचे कारण नाही. मुंबई दिल्लीश्वरांना अडीच लाख कोटी देत असते याचे भान ठेवून दिल्लीश्वर कोकणातील वादळग्रस्तांसाठी दोनेक हजार कोटी देतील अशी आशा बाळगायला काय हरकत आहे?, असा टोला सामनाच्या अग्रलेखातून लगावला आहे.
पंतप्रधानांचे विमान पाहणीसाठी महाराष्ट्रात का फिरले नाही?
- पंतप्रधान मोदी हे वादळग्रस्त गुजरात राज्याच्या दौऱ्यावर गेले.
- तौक्ते वादळामुळे गुजरातचे नुकसान झाले.
- त्याबाबत त्यांनी हवाई पाहणी केली व गुजरातला १००० कोटींचे पॅकेज जाहीर करून पंतप्रधान दिल्लीस रवाना झाले.
- तौक्ते वादळाने महाराष्ट्र आणि गोव्याचेही भयंकर नुकसान झाले आहे.
- अक्षरशः वाताहत झाली आहे, पण पंतप्रधानांचे विमान पाहणीसाठी महाराष्ट्रात का फिरले नाही?
- असा टीकेचा सूर महाराष्ट्रातील राजकीय पुढाऱ्यांनी काढला आहे.
- पंतप्रधान गुजरातला गेले.
- दीव, रुना, जाफराबाद, महुआची पाहणी केली.
- विमानात बसून गुजरातची पाहणी करत असलेल्या पंतप्रधानांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत.
- पंतप्रधानांच्या हाती गुजरातचा नकाशाही दिसत आहे.
- पंतप्रधानांनी तत्काळ एक हजार कोटी दिले व आता पाठोपाठ केंद्र सरकारचे उच्चस्तरीय पथकही गुजरातला येईल.
- नुकसानीचा आढावा घेईल व त्या आधारावर गुजरातला पुन्हा आर्थिक मदत केली जाईल.
गुजरात हे महाराष्ट्राचे जुळे भावंडच
- काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावर टीका करून मोदी हे फक्त गुजरातचेच पंतप्रधान आहेत काय?
- गुजरातच्या बरोबरीने महाराष्ट्राला नुकसानभरपाई का नाही? असा सवाल केला आहे.
- पंतप्रधान गुजरातला एक हजार कोटींची मदत देतात आणि महाराष्ट्राला मात्र जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करून कोरोना उपायांबाबत ‘प्रवचन’ देतात, अशीही टीका केली जात आहे.
- अर्थात, गुजरातला मदतीचे एक हजार कोटी दिले म्हणून महाराष्ट्राला वाईट वाटून घेण्याचे कारण नाही.
- गुजरात हे महाराष्ट्राचे जुळे भावंडच आहे.
- पण मदतीच्या बाबतीत अलीकडे महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक दिली जात आहे हे योग्य नाही.
तौक्ते वादळामुळे गावेच्या गावे उद्ध्वस्त
- तौक्ते वादळाने के कोकण किनारपट्टीवरील गावेच्या गावे उद्ध्वस्त झाली.
- घरेदारे, रस्ते, जनावरे, शेती-बागांचे नुकसान झाले.
- वादळामुळे शेकडो विजेचे खांब कोसळले आहेत व कोकणातील अनेक गावे आजही अंधारात आहेत.
- रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे जिल्हयातील आंबा, काजू , कोकम, नारळी-पोफळीची शेकडो झाडे उन्मळून पडली आहेत.
- किनारपट्टीवरील मच्छिमारांच्या नुकसानीचा अंदाज करता येत नाही.
- मच्छिमारांच्या नौका वाहून गेल्या किंवा फुटून-तुटून गेल्याने त्यांच्या पोटापाण्याचे साधनच हिरावले.
- मुंबईतील कोळीवाड्यांनाही वादळाचा फटका बसला.
- वरळी, माहीम, वेसावे वगैरे भागातील कोळीवाड्यांत आकांत झाला आहे.
पंतप्रधानांचे हे वागणे भेदभावाचे
- वादळाचा तडाखा मुंबईच्या अरबी समुद्रातील ऑइल फिल्डला बसला.
- मुंबई ‘हाय’जवळील बोट दुर्घटनेत चाळीसच्या आसपास लोक बुडून मरण पावले.
- नौदलाने मदत केली नसती तर त्या दुर्घटनेचे वर्णन करायला शब्द कमी पडले असते.
- ७५ कामगारांना तेथे जलसमाधी मिळाली असावी ही भीती आहेच.
- महाराष्ट्रावर इतके मोठे संकट कोसळूनही पंतप्रधान फक्त गुजरातची हवाई पाहणी करून निघून जातात हे वेदनादायक आहे.
- गुजरातच्या हवाई मार्गाने पंतप्रधानांना गोव्याच्या नुकसानीचीदेखील पाहणी करता आली असती.
- पंतप्रधानांचे हे वागणे भेदभावाचे आहे व महाराष्ट्राला मदत न करण्याची त्यांची भूमिका धक्कादायक असल्याचे मत काँग्रेस – राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मांडले.
हे फडणवीस यांना तरी पटेल काय?
- महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तत्काळ कोकणच्या दौऱ्यावर गेले.
- त्यांनी चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
- जनता व अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
- वादळग्रस्तांना राज्य सरकारने भरघोस मदत द्यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
- हीच मागणी त्यांनी अधिक जोरकसपणे केंद्राकडेही केली पाहिजे.
- फडणवीस हे महाराष्ट्राचे आहेत.
- त्या नात्याने पक्ष वगैरे बाजूला ठेवून त्यांनी गुजरातच्या बरोबरीत महाराष्ट्राला आर्थिक पॅकेज मिळावे असे मोदी साहेबांना सांगायला हवे.
- गुजरातला चोवीस तासांत हजार कोटी व महाराष्ट्राला काहीच नाही हा सापत्नभाव फडणवीस यांना तरी पटेल काय?