मुक्तपीठ टीम
वडाळा परिसरात एमडी आणि गांजा विक्री करणार्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या अधिकार्यांनी अटक केली. मोहम्मद इक्बाल अब्दुल हमीद मेमन आणि जमीर अहमद अब्दुल खलिक अन्सारी अशी या दोघांची नावे असून ते दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, त्यांच्याविरुद्ध आग्रीपाडा आणि नागपाडा पोलीस ठाण्यात चार गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे चौदा लाख रुपयांचा एमडी आणि गांजाचा साठा जप्त केल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले.
अटकेनंतर त्यांना स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई शहरात गेल्या काही महिन्यांत ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम सुरु करण्याचे आदेश वरिष्ठांनी ऍण्टी नारकोटीक्स सेल, गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अशा ड्रग्ज तस्कराची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान शिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडाळा येथील दारुखाना रोड, उडीपी हॉटेलजवळ काहीजण एमडी आणि गांजाची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांना मिळाली होती. या माहितीनंतर सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक निनाद सावंत, संजय निकम, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कृष्णा नार्वेकर, पोलीस हवालदार सदानंद परब, संदीप कांबळे, पोलीस नाईक संदीप तळेकर, अजय बल्लाळ, पोलीस शिपाई अनुपम जगताप, पोलीस शिपाई चालक लखन चव्हाण यांनी शुक्रवारी सकाळी उडीपी हॉटेलजवळ साध्या वेशात पाहत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या मोहम्मद इक्बाल आणि जमीर अन्सारी या दोन संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.
आरोपीयांची अंगझडती घेतल्यानंतर पोलिसांना त्यांच्याकडे १३ लाख ५० हजार रुपयांचे १३५ एमडी आणि ४५ हजार रुपयांचा १ किलो ८५० ग्रॅम वजनाचे गांजा सापडला. त्यांच्याविरुद्ध शिवडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता, गुन्हा दाखल होताच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांचा तपास युनिट चारचे अधिकारी करीत आहेत. तपासात ते दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, त्यांच्याविरुद्ध नागपाडा आणि आग्रीपाडा पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल असल्याचे पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले.